(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल, 19 सप्टेंबरला होणार अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं आहे. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर (Queen Elizabeth II Death) त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं आहे. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. तब्बल 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचं पार्थिव विमानाद्वारे ब्रिटनमध्ये दाखल झालं असून त्यांच्यावर सोमवारी राजेशाही इतमामात अंतसंस्कार करण्यात येतील. त्यांचं पार्थिव लंडनमधील ( London) विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल.
19 सप्टेंबरला होणार अंत्यसंस्कार
मंगळवारी संध्याकाळी रॉयल एअरफोर्सच्या विमानानं त्यांचं पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आलं. क्वीन एलिझाबेथ यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जनसमुदाय लोटला आहे. महाराणीचं पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) ठेवण्यात आलं आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव 19 सप्टेंबर रोजी विंडसर, लंडन येथील किंग जॉर्ज IV मेमोरियल चॅपल येथे दफन केलं जाईल.
500 परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाच्या बातमीने जगावर शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराणीच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे 500 परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी परदेशी नेत्यांनाही विमानतळावरून हेलिकॉप्टर सेवा दिली जाणार नाही, असा निर्णय लंडनमध्ये घेण्यात आला आहे. प्रत्येकाला बसने जावं लागेल.
लांबच लांब रांग लागण्याची शक्यता
महाराणीच्या शेवटच्या दर्शनासाठी लाखो नागरिकांनी 30 तास आधीच तळ ठोकला आहे. महाराणीला अंतिम दर्शनासाठी लांबच लांग रांग लागण्याची शक्यता आहे. आतापासूनच पॅलेसबाहेर हजारोंचा जनसमुदाय जमला आहे. संपूर्ण लंडनमध्ये सध्या महाराणीचे अंत्यसंस्कार योग्यरितीने पार पाडण्याची तयारी सुरु आहे. महाराणीच्या अंतिम दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना फक्त एक छोटी पिशवी सोबत ठेवण्यास सांगितली आहे. यामध्ये लोक छत्री, मोबाईल फोन आणि आवश्यक औषधे ठेवू शकतात.
महाराणी एलिझाबेथ सात दशकं महाराणी होत्या
एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा आणि सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या.