(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US President: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार? सर्वेमध्ये बायडन यांना धक्का
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्याचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना मागे टाकत आघाडीवर पोहोचले आहेत. हे स्विंग व्होट असलेली राज्य 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतील उमेदवारांचं भवितव्य ठरवतील.
Donald Trump vs Joe Biden, US President Election: अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला (US President Elections) आता एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक आहे. द हिलच्या अहवालानुसार, प्रमुख स्विंग राज्यांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून असं दिसून येतं की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्याचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना मागे टाकत आघाडीवर पोहोचले आहेत. हे स्विंग व्होट असलेली राज्य 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतील उमेदवारांचं भवितव्य ठरवतील.
ताज्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प हे जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, ऍरिझोना, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्व्हेनियामध्ये मतपत्रिकेवर तृतीय पक्ष पर्यायासह आणि त्याशिवाय बायडन यांच्यापेक्षा पुढे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, 2020 मध्ये या प्रत्येक राज्यात जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर होते. ट्रम्प यांना 2024 मध्ये विजय मिळवायचा असेल, तर त्यांना या राज्यांमध्ये आघाडी मिळवावीच लागेल.
गेल्या निवडणुकीत जिथे विजयी झाले, यंदा त्याच जागांवर बायडन सर्वेक्षणात मागे
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, वरील राज्यांमध्ये पुढील राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प हे लोकांची पहिली पसंती राहिले आहेत आणि बायडन यांना त्यांची स्थिती सुधारण्यासाठी बरंच काम करायचं आहे. या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या सीएनएन सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियामध्ये जो बायडन यांच्यापेक्षा 5 टक्के गुणांनी पुढे आहेत. 2020 मध्ये बायडन यांनी हे राज्य सुमारे 12,000 मतांनी जिंकलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प मिशिगनमधील जो बायडन यांच्यापेक्षा 10 टक्के गुणांनी पुढे असल्याचंही सर्वेक्षणात आढळून आलं आहे. येथे विद्यमान राष्ट्रपती 2020 मध्ये सुमारे 1,55,000 मतांनी विजयी झाले होते. सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, दोन्ही राज्यांतील बहुसंख्य (जॉर्जियामध्ये 54 टक्के आणि मिशिगनमध्ये 56 टक्के) असं मानतात की, जो बायडन यांच्या धोरणांमुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे.
महत्त्वाच्या स्विंग राज्यांमध्ये जो बायडन डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे
या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या मॉर्निंग कन्सल्ट पोलमध्ये जो बायडनसाठी समान परिणाम दिसून आले. त्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष अनेक महत्त्वाच्या स्विंग स्टेटमध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा मागे आहेत. तो उत्तर कॅरोलिनामध्ये 11 गुणांनी, जॉर्जियामध्ये 7 गुणांनी, विस्कॉन्सिनमध्ये 6 गुणांनी, नेवाडामध्ये 5 गुणांनी, मिशिगनमध्ये 4 गुणांनी आणि ऍरिझोनामध्ये 3 गुणांनी मागे होता.
हेली यांना मागे टाक ट्रम्प आघाडीवर
वॉल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, निक्की हेली जरी राष्ट्राध्यक्ष बायडन यांना मागे टाकत आघाडीवर असल्या तरीदेखील त्या माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मात्र मागे टाकू शकलेल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम्प निक्की हेली यांना मागे टाकत आघाडीवर आहेत. सर्वेक्षणात ट्रम्प हेली यांच्यापेक्षा तब्बल 40 गुणांनी पुढे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना जवळपास 60 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. सर्वेक्षणातून एक धक्कादायक कलही समोर आला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दाखल असलेल्या कोणत्याही फौजदारी खटल्यात दोषी आढळले तरीदेखील ते बायडन यांच्यापेक्षा केवळ एक अंक मागे असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :