Planet of Diamonds : काय सांगता... हिऱ्यापासून बनलेला ग्रह, पृथ्वीपासून इतक्या दूर आहे 'हा' ग्रह; जाणून घ्या सविस्तर...
55Cancri E : शास्त्रज्ञांनी 2004 साली 55Cancri E या ग्रहाचा शोध लावला. जगभरातील सर्व अंतराळ संस्थांची नजर या ग्रहावर आहे.
मुंबई : पृथ्वीवर (Earth) अनेक मौल्यवान वस्तू आहेत, त्यापैकीच एक म्हणजे हिरा (Diamond). हिऱ्यांचा म्हटलं तर कोहिनूर हिऱ्याचा (Kohinoor Diamond) विषय निघतोच. पृथ्वीवर अनेक मौल्यवान हिरे आहेत, ज्यांच्या किमतीचा आपण सर्वसामान्य माणसं विचारही करु शकत नाही. पृथ्वीवर काही ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आहेत. पण, एक ग्रह असाही आहे, जो पूर्णपणे हिऱ्यापासूनच बनलेला आहे. जगभरातील सर्व अंतराळ संस्थांची नजर या ग्रहावर आहे.
हिऱ्यापासून बनलेला ग्रह
आजही अंतराळ अनेक रहस्य दडलेली आहेत. आज आम्ही तुम्हाला हिऱ्यांनी बनलेल्या एका ग्रहाबद्दल सांगणार आहोत. जर या ग्रहावर कोणताही देश अंतराळयान पाठवण्यात यशस्वी ठरला तर, मानवाच्या हाती हिऱ्यांचं घबाडंच लागेल असं म्हणायला हरकत नाही. शास्त्रज्ञांनी 2004 साली 55Cancri E या ग्रहाचा शोध लावला. हिऱ्यापासून बनलेल्या या ग्रहाचं नाव 55Cancri E असं आहे. या ग्रहाला Exo-Planet असंही म्हटलं जातं. जगभरातील देश या ग्रहाबाबत अधिक संशोधन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
2004 मध्ये लागला या ग्रहाचा शोध
शास्त्रज्ञांनी या ग्रहाचा शोध रेडियल वेलोसिटी (Radial Velocity) च्या मदतीने लावला होता. या ग्रहाची खासियत म्हणजे हा ग्रह संपूर्ण हिऱ्यांचाच बनलेला आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हा ग्रह सूर्याला नाही तर, त्या ताऱ्यांना प्रदक्षिणा घालतो ज्यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतो.
ग्रह हिरा कसा बनला?
या ग्रहाचं तापमान 2000 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. कारण तो त्याच्या ताऱ्याच्या अगदी जवळ आहे. यामुळे हा ग्रह अवघ्या 18 तासात आपलं एक वर्ष पूर्ण करतो. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात कार्बन आहे. या उच्च तापमानामुळेच या ग्रहाचा पृष्ठभाग पूर्णपणे हिरा बनला आहे. अहवालानुसार, एवढे तापमान कोणत्याही कार्बनचे हिऱ्यात रूपांतर करण्यासाठी पुरेसे असते.
हिरा तयार होण्याची नेमकी प्रक्रिया काय?
जेव्हा कार्बन अतिशय उच्च तापमानाला गरम केला जातो, तेव्हाच हिरे नैसर्गिकरित्या तयार होतात. या ग्रहावर कार्बनचं प्रमाण जास्त आहे आणि तो ज्या ताऱ्यांभोवती फिरतो, त्यातही कार्बनचे प्रमाण खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत जेव्हा हा ग्रह कार्बन असलेल्या तार्यांभोवती फिरतो, तेव्हा काही वेळा त्यांचे तापमान इतकं जास्त होतं की त्यांच्यावरील ग्रेफाइटचे हिरे तयार होतात.
पृथ्वीपासून या ग्रहाचं अंतर किती?
पृथ्वीपासून या ग्रहाचे अंतर 40 प्रकाशवर्षे आहे. सध्याच्या काळात तंत्रज्ञान अजून इतके विकसित झालेलं नाही की, ज्यामुळे आपण प्रकाशाच्या वेगानेही पुढे जाऊ शकू. त्यामुळे माणसाला या ग्रहावर पोहोचून तेथून हिरे आणणं सध्या अशक्य आहे.