अफगाणिस्तानात सक्रीय असणाऱ्या 152 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा
अफगाणिस्तानात सक्रीय असणाऱ्या 152 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा, अफगाणच्या लष्करानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.
काबूल : अफगाणिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. हेलमंद आणि कंदाहारमध्ये एक महिन्याआधी सुरु केलेल्या एका अभियानामध्ये जवळपास 70 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती अफगाणिस्तानच्या इंटेरियर अफेयर्स मंत्रालयाने दिली. तालिबान्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी अफगानी सुरक्षादलांनी हे ऑपरेशन राबवलं होतं.
या ऑपरेशनमध्ये 20 दहशतवादी कमांडर वेगवेगळ्या ठिकाणचे होते. तसेच 45 ते 100 दहशतवाद्यांचे ते नेतृत्व करत होते. तर कंदाहारमध्ये जवळपास 40 तालिबानी दहशतवादी कमांडर मारले गेले आहेत.
हेलमंदमध्ये मारले गेलेले 10 कमांडर उरुजगा, कंदाहार आणि गजनीमधून आलेले होते. कमीतकमी 152 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 65 मृतदेहांना डुरंड लाईनद्वारे ट्रान्सफर केलं गेलं आहे. तर 35 मृतदेहांना फराह, 54 मृतदेहांना हेलमंद तर 13 मृतदेहांना जाबुल आणि 13 मृतदेहांना उरुजगान प्रांतात पोहचवलं गेलं आहे.
या दरम्यान 30 तालिबानी कमांडर हेलमंदमध्ये जखमी झाले आहेत. या ऑपरेशनचे नेतृत्व चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मोहम्मद यासिन यांनी केलं आहे. हे ऑपरेशन अद्याप सुरु आहे. तालिबानच्या हल्ल्यात मागच्या 25 दिवसांत कमीतकमी 134 सामान्य लोक मारले गेले आहेत. तसेच 289 लोक जखमी झाले आहेत. मात्र, तालिबानने मंत्रालयाच्या या वक्तव्याचे खंडन केलं आहे.
जुलैमध्ये जाहीर केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं की, पाकिस्तानचे जवळपास 6,000 ते 6,500 दहशतवादी शेजारच्या अफगाणिस्तानात सक्रिय आहेत. यातील अधिकतर दहशतवाद्यांचा संबंध 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' या संघटनेशी आहे. ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांसाठी घातक आहेत. अमेरिकेचा सुरक्षा विभाग पेंटागॉनने देखील अफगानिस्तानवर काढलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा क्षेत्राला दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचा निर्वाळा दिला होता.