Washim: शिक्षक-मुख्याध्यापकांकडून दुसऱ्या शिक्षकाला जीवघेणी मारहाण, वाशिममधील धक्कादायक घटना
गंभीर मारहाण झाल्यानंतरही वाशिम पोलिसांनी यासंबंधित गुन्हा दाखल करुन घेतला नसल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाशिम: जिल्ह्यातील सूपखेला (Washim News) येथील काशिराम पाटील शिक्षण संस्थेतील सचिन परळकर या शिक्षकाला त्या संस्थेतील मुख्याध्यापक आणि इतरांनी चक्क शाळेतच मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी शिक्षकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी मात्र अद्यापही गुन्हा दाखल करुन घेतल नाही. राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जात असल्याची जोरदार चर्चा आहे.
वाशिम तालुक्यातील (Washim Updates) सुपखेला येथील काशिराम पाटील विद्यालयात सचिन परळकर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरगुती कारणास्तव परळकर यांनी तीन दिवसापूर्वी सुट्टीचा अर्ज केल्यानंतर त्यांना मस्टरवर गैरहजर दाखवण्यात आले होते. याबाबत परळकर यांनी विचारणा केली असता त्या ठिकाणच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकासह अन्य व्यक्तींनी परळकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसा आरोप परळकर यांनी केला आहे.
घटनेच्या 24 तासानंतरही पोलिसांत नोंद नाही
गंभीर मारहाण झालेल्या या शिक्षकाला जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही, 24 तास उलटून सुद्धा या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली नाही.
परळकर गेल्या अनेक वर्षांपासून याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. परळकर यांच्या अनुभवानुसार, योग्यतेनुसार ते मुख्याध्यापक म्हणून ते असायला हवे होते, मात्र क्षुल्लक कारणावरुन चुका संस्था चालक किंवा मुख्याध्यापकांकडून नेहमीच काढण्यात यायच्या आणि त्यांना त्रास देण्यात यायचा असा आरोप परळकर यांनी केला.
अशाच प्रकारे त्रास देऊन परळकर यांना नोकरीवरून काढण्यात आले होते. मात्र त्यांनी न्यायालयात धाव घेऊन, या बाबतीत प्रकरण चालवून न्याय मिळविला आणि न्यायालयाने संस्था चालकाला 17 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. याच गोष्टीचा राग धरून संस्थाचालक आणि मुख्याध्यापक हे परळकर यांना त्रास द्यायचे. या रागाचे पर्यवसन आता मारामारीत झाले आणि परळकर यांना पाच लोकांनी मिळून बेदम मारहाण केली.
परळकर यांच्या डोक्याला गंभीर इजा
या मारहाणीत परळकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांच्या पोटात काच घुसल्याने गंभीर दुखापत झाली. असा गंभीर प्रकार झाल्यानंतरसुद्धा पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र मारहाणीचे स्वरूप बघता गुन्हा न दाखल करणे म्हणजे राजकीय दबाव तर नाही ना अशी जोरदार चर्चा या परिसरात आहे.