VIDEO Bhavana Gawali : 'लाडकी बहीण' योजनेची मी पहिली लाभार्थी, मंत्रिपदही मिळून जाईल; समर्थकांच्या प्रश्नावर भावना गवळींचे उत्तर
Bhavana Gawali : निवडणूक जिंकणे हे सोपं काम नसतं, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते असं सांगत सलग पाच वेळा खासदार झाल्यानंतरही तिकीट कापलं, पण आपण नाराज झालो नाही असं भावना गवळी म्हणाल्या.
वाशिम : मुख्यमंत्री लाडकी योजनेची मी पहिली लाभार्थी आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी बहीण समजून मला उमेदवारी दिली असं विधानपरिषदेच्या नवनियुक्त आमदार भावना गवळी (Bhavana Gawali) म्हणाल्या. मंत्रिपदाचं काय असं समर्थकातून प्रश्न विचारल्यानंतर तेही भविष्यात मिळून जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. वाशिमधील सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
विधानपरिषदेच्या आमदारपदी भावना गवळी यांची नियुक्ती झाल्यानंतर वाशिमच्या कारंजा या ठिकाणी त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना भावना गवळी म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या नवीन लाडकी बहीण योजनेची पहिली खरी लाभार्थी म्हणून मी आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला बहीण समजून उमेदवारी दिली आणि मी आमदार म्हणून विधानपरिषदेवर गेले.
भावना गवळी म्हणाल्या की, मी कुठेही पोहोचण्यासाठी लवकर प्रयत्न करते, माझ्या गाडीला जर हेलिकॉप्टरचे पाते असते तर आणखी लवकर पोहोचले असते. त्यावर व्यासपीठाखालून एका समर्थकाने मंत्रिपद कधी मिळणार असं विचारल्यांतर भावना गवळी म्हणाल्या की, तेही भविष्यात मिळून जाईल. आपण चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळतं असंही त्या म्हणाल्या.
मी पाच वेळा खासदार, निवडणुकीत जिंकणं सोपं नसतं
भावना गवळी म्हणाल्या की, मी सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. निवडणूक जिंकणे सोपं नसतं. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मला यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज झाले नाही. काम करत राहिले. त्यामुळे आता आमदारकी मिळाली.
विधानपरिषदेवर पुनर्वसन
भावना गवळी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस निवडून आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. भावना गवळी यांना उमेदवारी न देता हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. मात्र ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी राजश्री पाटील यांचा दारुण पराभव केला.
भाजपच्या विरोधानंतर भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र भावना गवळींना विधानपरिषदेची आमदारकी देऊन एकनाथ शिंदेंनी त्यांचे पुनर्वसन केलं.
भावना गवळी यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या आधी गवळी या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस निवडून आल्या होत्या. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भावना गवळींनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. त्यानंतर नरेंद्र मोदींनीही भावना गवळींना राखी बांधल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.
ही बातमी वाचा: