Devendra Fadnavis : शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले..आम्ही सुरू केलं तर किती कोलांट्या उड्या हे साऱ्यांना कळेल
Wardha News : खऱ्या अर्थाने गॅसचे भाव पास-थ्रू सुरू करण्याचे काम काँग्रेसच्या काळात सुरू झालंय. त्यामुळे हे पाप काँग्रेसचे असल्याचे सांगात शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.
Maharashtra Politics : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड तनाव असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा सातत्याने गॅसचे भाव कमी करण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केलाय. खऱ्या अर्थाने गॅसचे भाव पास-थ्रू सुरू करण्याचे काम काँग्रेसच्या काळात सुरू झालंय. त्यामुळे हे पाप काँग्रेसच्या (Congress) काळात सुरू झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव पास-थ्रू होतील, हा निर्णय काँग्रेसनेच घेतला होता. त्याला रिलीफ देण्याचे काम मोदीजींनी केलंय. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्हाला हे सांगू नये. आम्ही जर त्यांचे व्हिडिओ दाखवणे सुरू केलं तर त्यांनी किती कोलांट्या उड्या घेतल्या हे साऱ्यांना कळेल, असा थेट इशारा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. ते वर्धा येथे बोलत होते.
गॅसचे भाव पास-थ्रू सुरू करण्याचे पाप काँग्रेसचं
आज देशाचा कारभार पंतप्रधान मोदी यांच्या हातात आहे. सत्तेत येताना मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती. नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 50 दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजची परिस्थिती बघता मोदी साहेबांनी (PM Modi) एकही शब्द पाळलेला दिसत नाही, असं वक्तव्य करत शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. आज, बुधवारी माढा लोकसभा मतदारसंघातील मोडनिंब येथील प्रचारसभेत बोलत असताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवत टीकास्त्र डागलं. अशातच शरद पवारांच्या या टीकेला उत्तर देताना हे सर्व पाप काँग्रेसच्या कार्यकाळातले असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खुर्चीच्या ऑफरवर आपले विचार सोडणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आमच्यावर बोलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. ते बाळासाहेबांच्या विचारांकरता सत्तेतून बाहेर पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर कुठलीही चौकशी नव्हती, त्यांच्यावर कुठल्याही भ्रष्टाचाराचे आरोपही नव्हते. त्यांच्या पाठीशी कोणीही लागलेलं नव्हतं. केवळ आणि केवळ विचारांकरता ते बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांनी सत्तेकरता, खुर्ची, पैशाकरता आपले विचार सोडले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये, असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना दिला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या