World's Shortest Air Journey : जगातील सर्वात छोटासा विमान प्रवास, फक्त 53 सेकंदांसाठी हवेत झेपावतं विमान; पर्यटकांचं आकर्षण
Islands of Scotland : फक्त 53 सेकंदांच्या सर्वात कमी वेळाच्या विमान प्रवासासाठी दररोज अनेक प्रवासी 14 पौंड म्हणजे, सुमारे 1815 रुपये खर्च करतात.
World's Shortest Air Journey : अनेकांना फिरण्याची आवड असते. काहींना रस्ते मार्गाने, काहींना ट्रेनने (Train Travel) तर काहींना हवाई मार्गाने (Flight Travel) प्रवास करायला आवडते. जगभरात अनेक सुंदर ठिकाणं आहेत, ज्यामधील अंतर एकमेकांपासून फार दूर आहेत. विमान प्रवासानेही असा लांब पल्ल्यांचा प्रवास करताना खूप वेळ जातो. तुम्ही दूरच्या जास्त वेळ घेणाऱ्या हवाई प्रवासाबद्दल ऐकलं असेल. भारतातून अमेरिका किंवा युरोपला गेल्यास अनेक तास विमानाने प्रवास करावा लागतो. तुम्ही दिल्लीहून मुंबईला विमानाने गेलात तरी किमान दीड ते दोन तास लागतील. पण असाही एक विमान प्रवास आहे, ज्यासाठी फक्त 53 सेकंदाचा वेळ लागतो.
फक्त 53 सेकंदांचा विमान प्रवास
या विमान प्रवासामध्ये विमानाने टेक ऑफ आणि लँड केल्यानंतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी फक्त 53 सेकंद लागतात. बरं हे प्रायव्हेट जेट नसून एक व्यावसायिक विमान आहे आणि दररोज अनेक प्रवासी या विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. हवामान साफ असेल तर हा प्रवास फक्त 53 सेकंदांमध्ये होतो. मात्र, हवामान खराब असेल तर या उड्डाणासाठी दीड मिनिटांचा वेळ लागू शकतो.
जगातील सर्वात छोटा विमान प्रवास
सर्वात छोटी फ्लाईट म्हणजे सर्वात कमी वेळाचं विमान उड्डाण स्कॉटलंडमधील (Scotland) आहे. हा विमान प्रवास फक्त सुमारे 53 सेकंदांचा असतो. स्कॉटलंडच्या दोन बेटांमधून (Island) उडते. या दोन बेटांना जोडणार पूल नसल्याने हे विमान उड्डाण केले जाते. या दोन बेटांमधील समुद्र अत्यंत खडकाळ आहे. त्यामुळे येथे बोट चालवणे खूप कठीण आहे. यामुळे प्रवासी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी या विमानाची मदत घेतात. हे उड्डाण लोगान एअरलाईनद्वारे चालवले जाते. ही एअरलाईन गेल्या 50 वर्षांपासून येथे सेवा देत आहे.
पर्यटक आणि स्थानिक घेतात हवाई सेवेचा लाभ
वेस्ट्रो आणि पापा वेस्ट्रे बेटांमध्ये 2.7 किलोमीटरचे अंतर आहे. या दोन्ही बेटांमध्ये पूल बांधणे खूप खर्चिक आहे. वेस्ट्रेमध्ये 600 लोक राहतात आणि सुमारे 90 लोक पापा वेस्ट्रेमध्ये राहतात. आपल्या देशात ज्याप्रमाणे बसस्थानकावर बसेस चालवल्या जातात त्याच पद्धतीने येथे विमानसेवा चालवली जाते. ही विमाने 8 आसनी आहेत, पर्यटक आणि स्थानिक लोक या हवाई सेवेचा लाभ घेतात.
हवाई प्रवासाशिवाय दुसरा मार्ग नाही
वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे दोन्ही बेटे आहेत. या दोन्ही बेटांना जोडणार कोणताही पूल नाही. या दोन्ही बेटांना जोडणारी कोणतीही बस किंवा ट्रेन सुविधाही नाही. त्यामुळे लोक विमानात बसून एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी विमान सुविधा हाच पर्याय आहे. त्यामुळे येथील स्थानिक आणि पर्यटक हवाई मार्गानेच प्रवास करतात.
सर्वात छोट्या फ्लाईटचा खर्च किती?
स्कॉटलँडमधील 53 सेकंदांच्या या सर्वात लहान उड्डाणासाठी दररोज प्रवाशांना सुमारे 14 पौंड खर्च करावे लागतात. 14 पौंड म्हणजे सुमारे 1815 रुपये. पण, स्कॉटलंडच्या चलनाच्या तुलनेत हे भाडे खूपच कमी आहे. दरम्यान, येथील सरकार या दोन बेटांवर राहणाऱ्या लोकांना या विमान भाड्यात सबसिडी देते, त्यामुळे या लोकांना कमी भाडे मोजावे लागते. या दोन बेटांवर सुमारे 690 लोक राहतात.
'या' बेटांचे नाव काय?
यापैकी एका बेटाचे नाव 'वेस्ट्रे' (Westray) आणि दुसऱ्या बेटाचे नाव 'पापा वेस्ट्रे' (Papa Westray) आहे. वेस्ट्रे बेटावर 600 लोक राहतात. तर पापा वेस्ट्रे बेटावर सुमारे 90 लोक राहतात. हे लोक ज्या फ्लाइटने प्रवास करतात ते खूप लहान विमान आहे. यामध्ये एका वेळी फक्त 8 लोक त्यात प्रवास करू शकतात. येथे राहणारे बहुतेक लोक पर्यटनातून आपला उदरनिर्वाह करतात. या छोट्या फ्लाइटमधून जगभरातून अनेक लोक येथे पर्यटनासाठी येतात. तुम्हालाही या छोट्या फ्लाइटने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्कॉटलंडला जावे लागेल.