Viral Video: पती-पत्नीच्या वादाचं रुपांतर हाणामारीत, 1833 ची 'ऐतिहासिक बाल्कनी' तुटून जोडपं खाली आपटलं, आता खटला चालणार
Viral News: पती-पत्नीमध्ये वाद नेमका का सुरु होता याची कुणाला माहिती नाही, पण वादाचं रुपांतर काही वेळातच हाणामारीत झालं आणि त्यामध्ये इमारतीची बाल्कनी मोडल्याने हे जोडपं थेट खाली पडलं.
Viral Video: आपल्याकडे पती-पत्नीचं भांडण कशावरुन होईल याचा काही नेम नाही. त्यानंतर रुसवा-फुगव्यात काही वेळ जातो आणि पुन्हा ते एकत्र येतात. पण हे भांडण जर हाणामारीपर्यंत पोहोचलं तर? असाच काही प्रकार रशियामध्ये घडला आहे. पती-पत्नीच्या भांडणात चक्क बाल्कनी मोडली आणि हे जोडपं दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली पडलं. तब्बल 25 फूट उंचीवरून पडल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ज्या बाल्कनीचं नुकसान झालंय ती 1833 साली बांधलेल्या ऐतिहासिक इमारतीची असल्याने या जोडप्यावर आता खटला चालवला जाणार असल्याची माहिती आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, 35 वर्षीय ओल्गा वोल्कोवा आणि एव्हगेनी कार्लागिन हे जोडपं रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये राहतं. त्यांच्यात एका गोष्टीवरून वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. भांडत असताना ते दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीत आले आणि थेट खाली पडले.
या जोडप्याचे घर अगदी रस्त्याच्या कडेला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे जोडपे बाल्कनीची रेलिंग तोडून 25 फूट खाली फुटपाथवर कसे पडले हे व्हिडीओमध्ये दिसतंय. पत्नी काँक्रीटच्या ढिगाऱ्यावर पडली, तर तिचा पती जमिनीवर पडला होता.
No backstory. Just gravity. pic.twitter.com/j3pnbKtJON
— Catch Up (@CatchUpNetwork) February 21, 2023
शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाल्कनीत हे जोडपे वाद घालत होते. त्यानंतर काही वेळात दोघेही बाल्कनीतून पडले. त्यानंतर ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सध्या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र या अपघातात त्यांचे दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत.
या जोडप्याला एक तरुण मुलगा आहे. या जोडप्याचा वाद नेमका कुठल्या कारणामुळे सुरू होता याची माहिती कुणालाच नाही. पण वादाचं रुपांतर हाणामारीत होऊन थेट बाल्कनी मोडेपर्यंत ते पोहोचल्याने यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, सेंट पीटर्सबर्ग प्रशासन आता या इमारतीची बाल्कनी दुरुस्त करण्यायोग्य आहे की नाही याचा तपास करत आहे. या जोडप्यावर खटला चालविला जाऊ शकतो असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. कारण ही इमारत सेंट पीटर्सबर्गच्या ऐतिहासिक जागेवर आहे आणि 1833 साली तिचं बांधकाम करण्यात आल्याचं सांगितलं जाते.
ही बातमीव वाचा: