Uddhav Thackeray : शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू, डिपॉजिट जप्त करु, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले
Uddhav Thackeray Mumbra : यापुढे कोणतीही निवडणूक असू द्या, गद्दारांचं डिपॉझिट जप्त करु. उद्यापासून प्रत्येक शाखेत शिवसैनिक जमतील. नेभळटांनो, हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या. मर्दाची अवलाद असेल तर या आणि भिडा, आमची तयारी आहे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
मुंब्रा, ठाणे: "तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारले आहेत. आता मधमाशा कुठे डसतील बघा. मुंब्र्याच्या शाखेची (Mumbra Shakha) कागदपत्र आमच्याकडे आहेत. गद्दारांचं डिपॉजिट जप्त करुन त्यांना घरी पाठवा. हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या", असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Mumbra) यांनी दिलं. मुंब्र्यात जर अनुचित घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. केसाला जरी धक्का लागला असता तर महाराष्ट्राने यांचे केस उपटून टाकले असते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. मुंब्रा इथल्या शिवसेना शाखेच्या दाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. उद्धव ठाकरे मुंब्रा इथल्या शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी गेल्यानंतर प्रचंड राडा झाला. पोलिसांनी रोखल्याने ते माघारी परतले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या स्टेजवरुन उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
यापुढे कोणतीही निवडणूक असू द्या, गद्दारांचं डिपॉझिट जप्त करु. उद्यापासून प्रत्येक शाखेत शिवसैनिक जमतील. नेभळटांनो, हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या. मर्दाची अवलाद असेल तर या आणि भिडा, आमची तयारी आहे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावेळी राडा
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Mumbra visit) हे मुंब्रा दौऱ्यावर असातना, मोठा राडा पाहायला मिळाला. मुंब्रा इथल्या ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा घेत,त्यावर बोलडझर फिरवल्याचा आरोप आहे. याच शाखेच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे मुंब्रा इथं दाखल झाले.मात्र या शाखेकडे जाण्यापासून उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी रोखलं. उद्धव ठाकरे गाडीतून उतरुन थेट बॅरिकेट्सजवळ पोहोचले. यावेळी शाखेजवळ प्रचंड राडा पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरु होती. तर ठाकरेंचे शिवसैनिकही आक्रमक होऊन घोषणाबाजीनेच उत्तर देत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Mumbra) यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. उद्धव ठाकरे हे मुंब्र्यातील शाखेकडे जात असताना, पोलिसांनी ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना रोखलं. त्यामुळे जोरदार राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे शाखेची पाहणी करुन जवळच असलेल्या स्टेजवरुन संबोधन करण्याचं नियोजन आहे.
दुसरीकडे मुंब्रा शाखेबाहेर एकनाथ शिंदे यांचे समर्थक नरेश म्हस्के आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ठाकरेंना आधीपासूनच जोरदार विरोध दर्शवला होता. पण उद्धव ठाकरे हे या शाखेकडे जात असताना काहीसा गोंधळ उडाला. पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेकडे न जाण्याचं आवाहन केलं, पण ठाकरेंनी त्या शाखेत नेमकं काय झालंय हे पाहण्याची विनंती केली. यावेळी ठाकरेंचे खासदार संजय राऊत, राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते. पोलिसांनी उद्धव ठाकरेंचा ताफा शाखेपासून काही अंतरावर थांबवण्यात आला.
यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत हे गाडीतून बाहेर आले. उद्धव ठाकरेंनी पोलिसांशी संवाद साधला. त्यानंतरही उद्धव ठाकरे हे ठाण्यातील त्या शाखेकडे निघाले होते.मात्र पोलिसांनी त्यांना न जाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे शाखेपासून 10 मीटर अंतरावरुन माघे फिरले.
लफंग्यांना पुढे करुन अडवणूक: विनायक राऊत
ही शाखा शिवसेनेची होती. त्या शाखेचा ताबा अधिकृत घेतला. कंटेनर आणून बसवला. पोलिसांच्या माध्यमातून शिंदे गटाचे गुंड आणून ठेवले. लफंग्यांना पुढे केलं जात आहे, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला. ही शाखा आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणारच असा निर्धार विनायक राऊत यांनी केला. ज्या गुंडांना नोटीस दिली, त्यांना बाहेर येऊ कसं दिलं, असं राऊत म्हणाले.
शिवसैनिकांना घाबरुन उद्धव ठाकरे मागे गेले : मीनाक्षी शिंदे
हा आमचा विजय आहे. शिवसैनिकांना घाबरुन उद्धव ठाकरे मागे गेले. शिंदे साहेबांच्या मागे शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे आम्हाला गुंड म्हणत असतील, तर हेच गुंड इतके वर्ष मागे होते. जी शिवसेना दिघे साहेबांनी वाढवली, शिंदे साहेबांनी वाढवली त्यावर हे मालकी सांगत असतील तर त्यांना जागा दाखवली, असा हल्लाबोल शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला.
मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय?
मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप आहे.
आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता.
मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे (Rajan Kine) यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.