Ganeshotsav 2022 : दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे, एक हजार पोलीस तैनात, गणेशोत्सवासाठी कल्याण डोंबिवली प्रशासन सज्ज
Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, शहरात अनुचित प्रकार घडू नये, गणेश सार्वजनिक गणेश मंडळांसह विसर्जनस्थळी तसंच विविध चौकांमध्ये असे मिळून 2 हजार 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर शहरावर राहणार आहे.
Ganeshotsav 2022 : यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) निर्विघ्न पार पडावा, उत्सवादरम्यान शहरात अनुचित प्रकार घडू नये, शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण परिमंडळ 3 देखील सज्ज झाले आहे. यासाठी गणेश सार्वजनिक गणेश मंडळांसह विसर्जनस्थळी तसंच विविध चौकांमध्ये असे मिळून 2 हजार 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV Camera) नजर शहरावर राहणार आहे. तर तब्बल एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या उत्सवादरम्यान तैनात असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाहनचालकांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सूचित करण्यात आले असून नागरिकांनी या सूचांनाचे पालन करावे अस आवाहन पोलिसांनी केले आहे.
कल्याण डोंबिवली हद्दीत 287 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून गणेश मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. तसेच घरगुती गणपतींची संख्या 42 हजार 270 आहे. त्याचबरोबर घरगुती गौरी पूजनाची संख्या 3 हजार 467 आहे. यंदा निर्बंध नसल्याने गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात आहे. मात्र कायदेशीर नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंडळासह नागरिकांना पोलिसांकडून करण्यात आले आहे. एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी या पोलिसांच्या उपक्रमांतर्गत शहरात 1 हजार 527 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या 643 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीचे पावित्र्य राखले जावे यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे सूचित केले आहे. गणेशोत्सव पार पडल्यावर हा कॅमेरा मंडळांनी शेजारच्या चौकात एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी या उपक्रमांतर्गत लावायचा आहे. गणेशोत्सव काळात एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. 150 पोलीस अधिकारी, 250 होमगार्ड आणि एसआरपीच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये अवजड वाहनांना बंदी आहे. तसेच एकेरी वाहतूक आहे. याचे पालन वाहन चालकांसह गणेश भक्त आणि मंडळांनी करायचे आहे. त्याची अधिसूचना ठाणे वाहतूक नियंत्रम पोलीस कार्यालयाकडून काढण्यात आली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहतूक राहणार बंद
गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 1 सप्टेंबर दीड दिवस, 4 सप्टेंबर पाच दिवस, 5 सप्टेंबर गौरी गणपती विसर्जन, 6 सप्टेंबर सात दिवसांचे, 7 सप्टेंबर मेळा संघ एकादशी विसर्जन, 8 सप्टेंबर नऊ दिवसांचे, 9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून विसर्जन संपेपर्यंत शहरातील अंतर्गत मार्गावर जड अवजड वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी येथे नो पार्किंग झोन
आधारवाडी सर्कल ते दुर्गा माता चौक, सहजानंद चौक ते दुर्गा माता चौक, तसेच दुर्गा माता चौक ते उर्दू स्कूल यादरम्यान संपूर्ण रोड सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन
गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये पर्यायी मार्ग
- कोनगाव कडून दुर्गाडी मार्गे कल्याण शहराच्या दिशेने येणारी सर्व प्रकारचे हलकी वाहने ही वाडेघर चौक आधारवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील
- कोळशेवाडीकडून कोनगावच्या दिशेने जाणारी सर्व हलके वाहने ही गोविंदवाडी बायपास नाक्यावरुन गोविंदवाडी मार्गे इच्छित स्थळे जातील.
- कोनगाव बाजूकडून डोंबिवली-मानपाडा-कल्याण शिळफाटा-शिळफाटाच्या दिशेने सर्व हलके वाहने ही दुर्गाडी पुलावरुन रोडच्या विरुद्ध दिशेच्या लेन वरुन दुर्गाडी गोविंदवाडी बायपासच्या मार्गाने इच्छित स्थळी जातील.
- कोनगाव गणेश घाट आणि दुर्गाडी गणेश घाट येथील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी झाल्यास या मार्गाची वाहतूक पर्याय मार्ग म्हणून कल्याण शहरातून गांधारी पूल मार्गे येवई नाक्याकडे व कल्याणकडे येण्यासाठी येवई नाकावरुन गांधारी पुल मार्गे अशाप्रकारे मार्गक्रमण करतील