Thane : ठाण्यात आता 'दिघे-शिंदे' आमने सामने, केदार दिघेंनी केलं नवरात्रौत्सवाचं पाट पूजन
Kedar Dighe : एकनाथ शिंदे यांच्या आधी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मूर्तीचे पाट पूजन केलं. त्यामुळे येत्या काळात ठाणेकरांना शिंदे विरुद्ध दिघे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे : गणेशोत्सवात आमने सामने आलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वादाचा दुसरा अंक आता ठाणेकरांना (Thane) पाहायला मिळणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे (Kedar Dighe) असा सामना रंगण्याची शक्यता असून त्याची सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी पाट पूजन केलं आहे.
ठाण्यातील टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील अंबे मातेची मूर्ती आजपासून घडवण्यास सुरुवात झाली. त्याच मूर्तीचा आज पाट पूजनाचा मुहूर्त होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आधीच पोहोचून केदार दिघे (Kedar Dighe) यांनी पाट पूजा केली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाट पूजन केलं. त्यामुळे टेंभी नाका येथील नवरात्रौत्सव नेमका कोणाचा असा वाद निर्माण होऊ शकतो.
केदार दिघे यांच्यावर शिवसेनेने सोपवली जबाबदारी
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसेनेमध्ये (Shivsena) मोठी फुट पडली. त्यानंतर ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला. दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी (Thane Shivsena) नियुक्ती जाहीर केली. तर आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्यातील शिवसेनेचा (Shivsena) चेहरा झाले होते. ठाणे, पालघर, कल्याण-अंबरनाथ या पट्ट्यात एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केले. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठाणे, पालघरमधून मोठी पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनी गृहीत धरली होती. बंड चिघळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी अनेक जु्ने शिवसैनिक सक्रिय झाले आहेत.
ठाण्यातही आनंद दिघे (Anand Dighe) यांचे सहकारी राहिलेले खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटले असल्याची चर्चा होती. त्यामुळे केदार दिघे हे काही काळ पक्ष कार्यापासून दूर होते असं सांगितलं जायचं. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले कार्यकर्तेदेखील पु्न्हा शिवसेनेत सक्रिय होत आहेत.