Jitendra Awhad : ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्यानंतर कारवाई
Jitendra Awad : ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे महापालिकेच्या बाहेर मारहाण केल्याप्रकरणी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) यांच्या मुलीला आणि जावायाला मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आव्हाड समर्थकांनी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे महापालिकेच्या बाहेर मारहाण केली आहे. या घटनेनंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा या नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याचा उल्लेख करण्यात आलाय. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा हा ऑडियो व्हायरल झाला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आपण कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हटले आहे.
ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महेश आहेर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून आहेर यांना मारहाण करण्यात आली आहे. परंतु, याबाबत दोन्ही बाजूने अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
जितेंद्र आव्हाडांकडून पैसे मोजत असल्याचा व्हिडीओ ट्वीट
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे नावाची व्यक्ती असल्याचा आरोप केला आहे. तसा एक व्हिडिओ देखील नुकताच जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने ट्विट करण्यात आला आहे.
महेश आहेर जखमी
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून महेश आहेर यांना ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर केलेल्या महाराणी नंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अगोदर देखील माझ्यावरती हल्ला होणार होता या संदर्भात पोलिसांना माहिती दिली होती. जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेऊन सौरभ वर्तक हा वारंवार मला धमकी देत असल्याचं आहेर यांनी म्हटलं आहे. ज्या पद्धतीने माझ्यावरत हल्ला झाला आहे, जी ऑडिओ क्लिप आहे ती मी ऐकली नाही. मात्र पोलिस माझ्यावर हल्ला झाल्या प्रकरणी कारवाई करत आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा या ठिकाणी आम्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. आम्ही कारवाया तशा करू नये म्हणून आमच्यावर दबाव येत होता. वारंवार मला धमक्यांचे फोन येत असत. त्या संदर्भात नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये देखील मी सौरभ वर्तक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या तुरुंगात आहे, अशी माहिती महेश आहेर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या