Thane : मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिसांना दिसत नाहीत का? - आनंद परांजपे
Thane : राजकीय गुन्हे करणारे तडीपार, मात्र खुनाचे आरोपी मोकाट, आनंद परांजपे यांचा पोलीस आयुक्तांना सवाल...
Anand Paranjpe : राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या मंचावरच जन्मठेप झालेले गुंड दिसत असतात. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिस आयुक्तांना दिसत नाहीत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाच्या हत्येची सुपारी दिल्यासंदर्भात असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय गेटवर महेश आहेर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशांत गायकवाड या चौघांना अटक केली होती. या गुन्ह्यात नाव असलेले अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशंत गायकवाड यांना नौपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी हद्दपारीची सर्वसाधारण कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांच्या या कारवाईचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला.
या संदर्भात परांजपे यांनी म्हटले की, राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी 2 वर्षांसाठी ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याची नोटीस जारी केली आहे. नौपाडा विभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांच्या सहीची 6 मार्च रोजीची नोटीस 13 मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास देण्यात आली आहे. लगेच 4 वाजता सुनावणीला उपस्थित राहण्यासंदर्भात फर्मावण्यात आले. त्यानुसार अभिजीत पवार, विक्रम खामकर, हेमंत वाणी आणि विशांत गायकवाड हे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन त्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अधिकचा वेळ मागीतला. ठाणे पोलिसांनी त्यांना सात दिवसांचा अवधी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा एककलमी कार्यक्रम ठाणे पोलिसांचा सुरु आहे. त्या विरोधात आमचा न्यायालयीन लढा सुरुच आहे. मात्र, मागील काही महिन्यात जामीन देताना न्यायालयाने ठाणे पोलिसांच्या बाबतीत जी निरीक्षणे नोंदविली आहेत; त्याकडे पाहता, ठाणे पोलिसांनी न्यायालयाच्या निरीक्षणांमधून धडा घेतलेला नसल्याचेच दिसून येत आहे. ठाणे पोलीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी लष्कर असल्यासारखे काम करीत आहे. तडीपारीची नोटीस कार्यकर्त्यांनी स्वीकारुन न्यायालयीन लढाईस सुरुवात केली आहे. पण, ठाणे पोलिसांना आपला एक सवाल आहे की, मुख्यमंत्री जेव्हा ठाण्यात येतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला असलेले अनेक नामचीन गुंड ठाणे पोलिसांना दिसत नाहीत का? त्यातील अनेक गुंडांना हत्येसारख्या गुन्ह्यात जन्मठेप झालेली असून अपीलात गेल्यामुळे सध्या ते जामीनावर मुक्त आहेत. एकाने तर मध्यमथरी कब्बडी स्पर्धा आयोजित केली होती. हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला एमपीडीए लागलेला गुंड जात असतो. एमसीएच्या बैठकीत कोण गुंड असतात? मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनेक नामचीन गुंड वावरताना दिसत असतात, असे परांजपे म्हणतात.
मुख्यमंत्र्यांच्या सोबत मंचावरही दिसतात. त्यामुळे ठाणेकर म्हणून आपणाला अनेकदा लाज वाटते की, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना पोलीस अधिकारी सलामी ठोकतात; त्यावेळी फ्रेममध्ये नामचीन गुंड दिसून येतात.याच्यावर ठाणे पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांवर राजकीय आंदोलनातील गुन्हे आहेत. तरीही, त्यांना तडीपार केले जात आहे. पण, नामचीन गुंडांकडे तिरक्या नजरेने बघायचीदेखील हिम्मंत ठाणे पोलीस दाखवित नाहीत. हे ठाणे शहराचे दुर्भाग्य आहे. नुकतेच जांभळी नाका येथे शिंदे गटाच्या एका एका कार्यकर्त्याचा खून झाला. ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. त्याकडे बघायला ठाणे पोलिसांना वेळ नाही. पण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला वेळ आहे, अशी टीकाही आनंद परांजपे यांनी केली. शिवसेनेचे विजय साळवी आणि एम. के मढवी यांच्यावरही अशीच तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. त्यामुळे आता आपण पुन्हा सांगतो की, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीतसिंग हे जनरल डायरसारखे वागत आहेत. त्यामुळेच पोलिसांनी असा त्रास देण्याऐवजी आम्हाला साकेत मैदानात बोलावून आमच्यावर एके 47 ने गोळ्या झाडाव्यात, अशीही टीका आनंद परांजपे यांनी केली.