Jitendra Awhad: शिवरायांच्या बदनामीला विरोध केल्याने मला अटक, त्यामागे आम्ही काहीही करु शकतो ही मानसिकता: जितेंद्र आव्हाड
Har Har Mahadev: हर हर महादेव या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
ठाणे : कायदा आपल्याला हवा तसा वापरु शकतो, आम्ही काहीही करु शकतो अशा मानसिकतेतून आपल्याला अटक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मला अटक करताना पोलिसांची हतबलता त्यांच्या डोळ्यात दिसत होती. पोलिसांचा या प्रकरणात कोणताही हात नाही. मला चौकशीसाठी बोलावलं आणि अटक करण्यात आली असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. शिवरायांच्या बदनामीला विरोध केल्यानेच मला अटक करण्यात आली असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
विवियाना मॉलमधील प्रेक्षकाला मी मारहाण केली नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. हर हर महादेव चित्रपटाला आपला विरोध का आहे, त्यामागे आपली भूमिका काय आहे याबद्दल आव्हाडांनी यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून स्पष्ट केली. हर हर महादेव या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या संबंधित चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच इतिहासाचा याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं ते म्हणाले. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकांनी चुकीचा इतिहास दाखवला असून त्यांनी लोकांची माफी मागितली पाहिजे असंही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "महाराष्ट्रत हा चित्रपट कुठेही लागू नये यासाठी याला मी विरोध करत होतो, आणि पुढेही करणार आहे. जामीन देणारे गुन्हे दाखल असताना मला आत कसा बसवता येईल यासाठी दबाव टाकण्यात आला. पण जितेंद्र आव्हाडला आतमध्ये आम्ही बसून दाखवलं हे महाराष्ट्राला दाखवायचं होतं. म्हणून सेक्शन 7 क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट लावण्यात आला आणि नॉन बेलेबल सेक्शन लावला. माझं म्हणणं आहे अधिकाराचा चुकीचा वापर केला गेला दबाव टाकण्यात आला. हे काम कोणाचं वेगळं सांगायला नको त्यांचं नाव सुद्धा मला काढायच नाही."
बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात चुकीचं लिखाण झालं, हे आम्ही समोर आणलं. पण याचं समर्थन राज ठाकरे यांनी केलं असं सांगत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हर हर महादेव एवढा विकृत चित्रपट महाराष्ट्रात आलेला नाही. त्यामागे कुठलाही पुरावा नाही, मराठ्यांचं शौर्य कमी करायचं हा हेतू आहे.
दरम्यान, विवियाना मॉल चित्रपटगृहातील प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि इतर 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांची 15 हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केलं.