Measles News: गोवरचा संसर्ग रोखणार कसा? ठाण्यातील अनेक ठिकाणी पालिकेच्या पथकाची अडवणूक
Thane News: गोवर संसर्गाला अटकाव करण्याचे प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहेत. तर, दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या पथकाला काही ठिकाणी नागरिकांकडून अटकाव केला जात आहे.
Thane News: राज्यात गोवरचा (Measles) संसर्ग वाढत चालला असून संशयित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर, दुसरीकडे महापालिकेच्यावतीने गोवरचा संसर्ग रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. गोवर संसर्गाबाबत सर्वेक्षण करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) पथकांची अडवणूक सुरू असून काही ठिकाणी अंगावर धावून जाण्यासारखे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडूनच सर्वेक्षणाला विरोध केला जात असल्याने गोवरचा संसर्ग रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोवर रोखण्यासाठी सध्या ठाणे महापालिकेने मुंब्रा व आजूबाजूच्या भागात सर्वेक्षण सुरू केले आहेत. ठाणे महापालिकेच्या काही पथकांवर मुंब्रा, कौसा, शीळ भागात काही पथकांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर, अनेक पथकांची नागरिकांकडून अडवणूक सुरू आहे. सर्वेक्षण करण्यास आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या तोंडावर दरवाजा आपटणे, सर्वेक्षणाला विरोध करीत थेट पथकाच्या अंगावर अख्खी सोसायटी धावून जाणे यासारख्या घटना घडत आहेत.
तर, काही नागरिकांकडून घरात असतांनाही बाहेरुन कुलुप लावून घरात नसल्याचे भासवणे, सर्वेक्षणासाठी पुन्हा या, अशी कारणे देऊन अक्षरश: पिटाळून लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे गोवरचा अटकाव करायचा कसा असा पेच पालिकेसमोर निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण 6 स्पॉटमध्ये सर्वेक्षण सुरू आहेत. मुंब्रा विभागात त्यापैकी 4 स्पॉट आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या नमुन्यात 274 पैकी 54 जणांना गोवरची लागण झाली आहे. त्यातील ३६ रुग्णांवर पार्किंग प्लाझा आणि १४ रुग्णांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यामध्ये 5 वर्षापर्यंतच्या बालकांची संख्या सर्वाधिक आहे. या वयोगटातील 70 टक्के रुग्ण आहेत. तर, सहा ते 15 वर्ष या वयोगटातील 29 टक्के आणि 15 ते 18 या वयोगटातील रुग्णाचे प्रमाण एक टक्के इतके आहे. बहुतांशी रुग्णांनी गोवरची लस न घेतल्याने त्यांना संसर्गाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गोवरचा संसर्ग मुंबईत आणि राज्यात आटोक्यात यावा यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आता कोरोनाच्या लाटेनंतर गोवरसाठीही विलगीकरण करण्याचा निर्णय राज्याच्या टास्क फोर्सने घेतला आहे. तशा प्रकारचे निर्देश जिल्हा प्रशासन, महापालिकांना दिले आहे. त्यामुळे गोवर झाल्यानंतर रुग्णाला किमान 7 दिवस विलगिकरणात राहावे लागणार आहे.