(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Shiv Sena:ठाणे: ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंविरोधात पोस्टवरून दोन गुन्हे दाखल; शिंदे गटाच्या महिलांनी केली होती मारहाण
Thane Shiv Sena: ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Thane Shiv Sena: ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता रोशनी शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोशल मीडियावरील ज्या पोस्टवरून त्यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याच सोशल मीडिया पोस्टवरून त्यांच्याविरोधात आता गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तर, रोशनी शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. या अर्जाद्वारे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले. मात्र त्यानंतर रोशनी शिंदे यांच्याच अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सोमवार 4 एप्रिल रोजी संध्याकाळी रोशनी शिंदे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिला गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांच्या तक्रारीवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे रोशनी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी भाजप पदाधिकारी संजय वाघोले यांनी देखील गुन्हा दाखल केला आहे. वाघोले यांच्या तक्रारीनंतर कलम 153 अ-1, कलम 499, कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे कुटुंबीयांनी घेतली रोशनी यांची भेट
ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथं जाऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विचारपूस केली. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून सोमवारी संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा बुधवारी मोर्चा
रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणी उद्या ठाण्यात पोलीस आयुक्त कार्यालयावर महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदारआदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. या मोर्चात खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा शिवाजी मैदान या ठिकाणाहून दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्या तक्रारीनंतरही कारवाई केली नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.