Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Kalyan Fraud Allegation : या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेणार असल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे.

कल्याण : कल्याण तहसीलदार कार्यालयात (Kalyan Tehsildar Office) अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार करून अवघ्या एका तासाच्या आत दुसऱ्या व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे कल्याणमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भाजप पदाधिकारी व विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनी याप्रकरणी तक्रार करणार असल्याचं सांगितलं.
खोटे कागदपत्रे तयार करून विकासक आणि शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करणारी टोळी कल्याणमध्ये सक्रिय असल्याचा आरोप करत म्हात्रे यांनी या प्रकरणाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
एका तासात फेरफार अन् नाव नोंदणी
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात भाजप पदाधिकारी प्रेमनाथ म्हात्रे यांनी एका शेतकऱ्याकडून जागा घेतली आहे. 6 ऑगस्ट रोजी या जागेच्या फेरफार उताऱ्यामध्ये अचानक बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सामान्य नियमानुसार कोणत्याही सातबारावर नाव नोंदणी किंवा फेरफार करताना किमान 15 दिवसांची मुदत आणि हरकतीसाठी नोटीस दिली जाते. मात्र, या प्रकरणात कोणतीही पूर्वसूचना न देता, अवघ्या एका तासात सर्व प्रक्रिया पूर्ण करून मूळ शेतकऱ्याच्या एका महिला नातेवाईकाचे नाव सातबारावर चढवण्यात आले.
तहसीलदारांवर आरोप
प्रेमनाथ म्हात्रे यांनी कल्याणचे तहसीलदार विकास गरुडकर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जेव्हा मी या संदर्भात तहसीलदारांना विचारणा केली, तेव्हा माझ्यावर एका मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव आहे, मी काही करू शकत नाही, असे उत्तर तहसीलदारांनी दिल्याचा दावा म्हात्रे यांनी केला.
"सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असतानाही माझ्यासोबत असा प्रकार घडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागात किती त्रास सहन करावा लागत असेल?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे धाव अन् उच्च न्यायालयात याचिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन तहसीलदारांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील गैरव्यवहाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर कल्याणचे तहसीलदार विकास गरुडकर यांनी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील माहिती देण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर





















