Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
Sukhbir Singh Badal Attacked: महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आला. बादल यांच्च्यावरील हल्ला नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये बादल यांना एका इमारतीत नेण्यात येत असल्याचं दिसतं,याशिवाय बादल यांच्या उजव्या हाताला कापड बांधलेलं देखील दिसतं. नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब येथे सुखबीर सिंह बादल त्यांची पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह काल गेले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीला अटक
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली आहे. या घटनेत आरोपीला तात्काळ अटक केली असून कोणत्या उद्देशाने हा हल्ला झाला, याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.सुखबीर सिंह बादल यांची प्रकृती चांगली आहे, असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
हल्लेखोर मूळचा पुण्याचा
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल याच्यावर हल्ला करणारा व्यक्ती वकील आहे. आरोपी जसपालसिंग याचं वय 62 वर्ष आहे. तो मूळचा पुणे येथील आहे. जसपालसिंग पुणे न्यायालयात वकील होता. मागील 2 वर्षांपासून नांदेड जवळील मुगट येथील मातासाब गुरुद्वारात तो सेवा करत आहे. आज सुखबीरसिंग बादल मातासाब गुरुद्वारातुन दर्शन बाहेर पडताच जसपालसिंग यानं हल्ला केला.जसपालसिंग याला जागेवरूनच अटक करण्यात आलं असून पोलीस चौकशी सुरु आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरानं नेमक्या उद्देशानं हल्ला केला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली, यावेळी बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली. मिळालेल्या माहितीनुसार सुखबिरसिंह बादल यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करू : पंकज भोयर
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली आहे. भोयर म्हणाले की घटना कदाचित आताच घडली असावी. मी पक्षाच्या बैठकीत भंडाऱ्यात उपस्थित होतो. घटनेची माहिती घेतली जाईल आणि संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी मांडली. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुद्वारा परिसरात हल्ला झाला या संदर्भात पंकज भोयर बोलत होते.
Before You Go
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर






















