Cidco Lottery 2026 : सिडकोची EWS साठी 4779 घरांची लॉटरी, 23.50 ते 43.50 लाखांमध्ये घरं मिळणार,15 ऑगस्टपासून नोंदणी
Cidco Lottery 2026 : नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि तळोजा येथील 4779 घरांच्या विक्रीसाठी सिडकोकडून लॉटरी काढण्यात येणार आहे.

नवी मुंबई : म्हाडाकडून मागील आठवड्यात मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. सिडकोकडून नवी मुंबईतील 4779 घरांच्या विक्रीसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. सिडकोची 4779 घरं खारघर, कळंबोली आणि तळोजा भागातील आहेत. ऑनलाइन नोंदणी सुरु होण्यापर्वी सिडकोनं घरांच्य किमती जाहीर केल्या आहेत. तळोजातील घराची किंमत 23.50 लाख, कळंबोलीतील घराची किंमत 37.70 लाख आणि खारघरमधील घराची किंमत 43.50 लाख रुपये आहे.
सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना 4779 सदनिका 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 2026रोजी सकाळी 11.00 वाजता www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-39 येथे 4229, कळंबोली बस डेपो येथे 257 आणि खारघर बस डेपो येथे 293 सदनिका उपलब्ध आहेत. योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव आहेत.
घरांच्या किंमती किती?
सिडकोनं 4779 घरांच्या विक्रीसाठी वेबसाईट अपडेट केली आहे. वेबसाईटवरील माहितीनुसार खारघर बस डेपो येथील घरांची किंमत 43.50 लाख रुपये आहे. या घराचं क्षेत्रफळ 322 चौरस फूट इतकं आहे. तर, कळंबोली बस डेपो येथील घराची किंमत 37.70 लाख रुपये आहे. सिडकोच्या या सोडतीत सर्वाधिक घरं तळोजा येथे आहेत. तळोजा येथील घरांची किंमत 23.50 लाख रुपये आहे.
उत्पन्न मर्यादा किती असावी?
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत; सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.
तळोजा, कळंबोली व खारघर हे नोइस विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे-मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत.
सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी-शर्तीच्या पूर्ततेच्या अधीन असतील. अद्ययावत आणि सविस्तर माहितीसाठी अर्जदारांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळास भेट द्यावी.
महत्त्वाच्या बातम्या





















