'सुरक्षा काढली, भाजपाच्या दडपशाहीला कंटाळलो,' शिंदेंची साथ सोडताना दीपेश म्हात्रेंची खदखद बाहेर; हाती बांधलं शिवबंधन!
विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : लवकरच विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) घोषणा होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून प्रत्येक मतदारसंघासाठी सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे प्रत्येक नेता मीच कसा सक्षम उमेदवार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही नेते मंडळी तर आपली राजकीय सोय लक्षात घेता पक्षबदल करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे भेटीगाठींचे सत्र वाढले आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपाची साथ सोडत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महाराष्ट्र युवा सचिव दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी 6 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल आहे.
भाजपाच्या दडपशाहीला कंटाळून निर्णय
या पक्षप्रवेशानंतर दीपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे तसेच भाजपावर उघड नाराजी व्यक्त केली. भाजपाच्या दडपशाहीला कंटाळून मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही 'हॅपी खड्डे' नावाचे बॅनर लावले होते यावरून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेली नाही. मी याबाबत खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र त्याबाबत काहीच झाले नाही.
माझी सुरक्षा काढून घेण्यात आली
मी कुटुंबासोबत देवदर्शनाला जात होतो. त्यावेळी रस्त्यामध्ये माझ्या अंगरक्षकांना फोन आला होता. अंगरक्षकांनी जिथे असेल तिथे उतरा असे सांगण्यात आले. सीनियर साहेबांचा फोन आहे, तुम्ही जिथे असाल तिथे उतरा, त्यांना सोडा आणि मिळेल त्या वाहनाने तुम्ही तिथून निघून असं या अंगरक्षकांना सांगण्यात आले होते. अशा प्रसंगाने घरचे लोक निराश झाले होते. तुम्ही सत्तेत आहात. तुमचे मुख्यमंत्री आहेत. तरीही तुम्हाला अशी वागणूक का दिली जाते, असे मला कुटुंबातील महिलांनी विचारले. घरच्यांना हे राजकारण काही माहिती नव्हतं. कुटुंबासमोर अशी घटना झाली. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या या घटनांमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
कल्याण पूर्व, पश्चिममध्ये मोठा राजकीय धमाका
भाजपाच्या दडपशाहीला कंटाळून पक्ष सोडला असल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली. डोंबिवलीत रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने खड्डे बड्डे असे बॅनर झळकले होते. हे बॅनर दिपेश म्हात्रे यांच्या सांगण्यावरून लावण्यात आल्याच्या आरोप दीपेश म्हात्रे यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना असलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढण्यात आली होती. दरम्यान, आता म्हात्रे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिममध्ये राजकीय पटलावर लवकरच मोठा धमाका होणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :