Dombivli Blast : डोंबिवलीतील केमिकल कंपन्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्यास विरोध, तीव्र आंदोलन उभारण्याचा गावकऱ्यांचा इशारा
Dombivli MIDC Explosion : डोंबिवलीमधील केमिकल कंपन्या पाताळगंगा मध्ये स्थालांतरीत करण्यास स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला आहे. त्याविरोधात आता आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राज्य सरकारने या ठिकाणच्या कंपन्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला आता पाताळगंगा गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. पाताळगंगा एमआयडीसी आणि निवासी परिसरामध्ये कोणताही बफर झोन शिल्लक राहिला नसून या ठिकाणी जर कंपन्या स्थलांतरित केल्या तर आंदोलन उभा करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
डोबिंवलीमध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत 8 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण जखमी झाले आहेत. त्याचसोबत या परिसरातील हजारो घरांचे नुकसान झाले. येथील एमआयडीसीला लागून नागरी वस्ती उभी राहिल्याने अखेर केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये स्थालांतरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
डोबिवली मध्ये केमिकल ब्लास्ट झाल्याने या भागातील केमिकल कंपन्या इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी पाताळगंगा एमआयडीसी भागात या कंपन्या स्थालांतरीत करण्यात येणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी मध्ये कंपन्या आणि नागरी वस्ती यामध्ये बफर झोन शिल्लक नसल्याने झालेल्या ब्लास्टमध्ये अनेक लोकांचे प्राण केले, तर हजारो घरांचे नुकसान झाले.
पाताळगंगामध्येही डोंबिवलीसारखीच अवस्था
बफर झोन असलेल्या भागात केमिकल कंपन्या स्थलांतरित व्हाव्यात हा सरकारचा हेतू असला तरी ज्या पाताळगंगा भागात केमिकल कंपन्या नेण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा एमआयडीसीची जागा आणि येथील गावं एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे पाताळगंगा भागात केमिकल कंपन्या स्थालांतरीत करण्यास येथील गावकरी, संघर्ष समिती आणि राजकीय पक्षांनी विरोध केला आहे.
सरकारने गावकऱ्यांनी विश्वासात न घेता केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये आणल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेकापचे सरपंच सुनिल सोनावळे आणि भाजपाचे पदाधिकारी विजय मुरकुटे यांनी दिला आहे. तर बेमुदत उपोषण करून सरकारला धारेवर धरणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मारूती पाटील यांनी सांगितले.
सरकारने गावकऱ्यांनी विश्वासात न घेता केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये आणल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- पाताळगंगा मधील जमिनी सरकारने 1982 साली घेतल्या.
- एकूण 3 हजार ऐकर जमीन घेतली.
- लहान - मोठ्या 145 कंपन्या आहेत.
- पाताळगंगा एमआयडीसीला लागून 11 गावं, 8 ठाकूरवाड्या, 8 कातकरी वाड्या आहेत.
- सध्या 10 ते 12 केमिकल कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत.
- पाताळगंगा इंजिनिअरिंग झोन असताना केमिकल कंपन्या येत आहेत.
- पाताळगंगामध्ये 18 ते 20 हजार लोकसंख्या आहे. पुढील पाच वर्षात ही लोकसंख्या 50 हजारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
सरकार आमच्या भागात कंपन्या आणून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देत असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू. सरसकट केमिकल कंपन्या स्थालांतरीत करण्यास आमचा विरोध राहील. ज्या कंपन्या अतीधोकादायक आणि ज्वलनशील असतील त्यांना आमचा विरोध राहील असे स्थानिक भाजपा आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केले आहे. तर काँग्रेस पक्षाने केमिकल कंपन्या येण्यास विरोध दर्शवला आहे. गेल्या तीन महिन्यात येथील केमिकल कंपन्यांना अनेक वेळा आग लागली आहे. हवेत विषारी धुर सोडून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने पाताळगंगा मध्ये केमिकल कंपन्या येण्यास आमचा विरोध असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य महेंद्र घरत यांनी सांगितले आहे.
ही बातमी वाचा: