Bhiwandi : भिवंडी-वाडा मार्ग बनला मृत्यूचा सापळा, खड्याने घेतले सहा बळी; सात वर्षात 400 हून अधिक जणांचा अपघाती बळी
Bhiwandi Accident : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत खड्ड्यामुळे सहा जणांचा बळी गेला असून फक्त भिवंडीत चार जणांचा बळी गेला आहे. यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे.
ठाणे : भिवंडी-वाडा-मनोर हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून 2015 पासून आतापर्यंत झालेल्या अपघातात तब्बल 400 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. खराब रस्ता, जागोजागी खड्डे, अपूर्ण काम यामुळे हे अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा या प्रमुख दोन रस्त्यांना जोडणारा दुवा म्हणून भिवंडी-वाडा-मनोर हा रस्ता ओळखला जातो. मात्र वाडा ते भिवंडी हा 40 कि.मी. अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून प्रत्येक पावसात तो खड्डेमय होताना दिसतो. त्यावर थातूरमातूर डागडुजी केली जाते. पुन्हा पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’अशीच स्थिती होते. या रस्त्याच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी पाच वर्षात अनेक आंदोलने झाली. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने आजही निष्पाप लोकांचे जीव जात असून संसार उघड्यावर पडले आहेत. मात्र मागील दोन महिन्यात खड्ड्यामुळे जिल्ह्यात सहा जणांचा बळी गेला आहे.
भिवंडी-वाडा महामार्गावरील कामवारी नदीच्या पुलावरील एक खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत खड्ड्यामुळे सहा जणांचा बळी गेला असून फक्त भिवंडीत चार जणांचा बळी गेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. अशोक काबाडी (वय 67) असे खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कवाड गावात रहाणारे अशोक काबाडी हे मुलगी अदिती (वय 25) हिच्या सोबत गणपती बाप्पाच्या मूर्ती पाहणीसाठी गेले होते. मूर्ती पाहून झाल्यावर अदिती आणि वडिलांच्या सोबत बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. त्यानंतर घरी परतत आसताना भिवंडी वाडा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अदिती हिने खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला आणि झालेल्या अपघातात मागून येणाऱ्या एका ट्रक चालकाने अदिती हिच्या डोळ्यासमोरच तिच्या वडिलांना ट्रक चालकाने चिरडलं. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये अदितीला देखील डोक्याला जबर मार लागला होता. तिला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे काबाडी कुटुंब हादरून गेलं असून गावात शोककळा पसरली आहे .
अदिती हिने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, भिवंडी वाडा महामार्गावरून वर्षानुवर्षे प्रवास करत आहे. परंतु या रस्त्यावरचे खड्डे कधी संपलेच नाही. अनेक वेळा खड्ड्यामुळे अपघात झाल्याचे आम्ही ऐकत होतो, परंतु याच खड्ड्यांमुळे माझ्या वडिलांचा जीव जाईल याची अपेक्षा देखील केली नव्हती. या मार्गावरून अनेक लहान मुलं प्रवास करत असतात, शाळकरी मुलं प्रवास करीत असतात आणि प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवले गेले पाहिजेत आणि चांगले रस्ते उपलब्ध केले पाहिजे. अदिती हिने आपल्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार प्रशासनाला ठरवले असून जर प्रशासनाने आपले काम व्यवस्थित केले असते तर त्यांचे वडील आज जिवंत असते. अनेक आजारापासून आम्ही वडिलांना वाचवलं, मात्र एका खड्ड्यापासून वाचवू शकलो नाही याची खंत आहे असं ती म्हणाली. हे बोलत असताना अदितीच्या डोळ्यातील अश्रू सर्व काही बोलून जात होते.
नुकतंच भिवंडी वाडा मार्गावर एका भंगार व्यवसायकाचा खड्ड्यामुळे अपघात झाला असून मागून येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडलं. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सईद पठाण असं मयताचे नाव आहे.
या खड्ड्यांच्या संदर्भात भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, रस्ता असला की खड्डे होणारच आणि त्यात पाऊस सुरू असला तर साहजिकच आहे की खड्डे होतील. मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका दिवस-रात्र प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले की भिवंडी वाडा मार्गावर पडलेले खड्डे दर आठवड्याला बुजवले जातात. मात्र हे खड्डे पुन्हा तयार होत असल्याने पावसाळा संपेपर्यंत खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहणार आहे. मात्र महापालिका आणि पीडब्ल्यूडी विभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी थातूरमातूर खूप काम होत असल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य काही कमी झालेले नाही. त्याचा परिणाम अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर पावसाळ्यानंतर रस्ते बनवणार असल्याचे पालिका आणि पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु प्रश्न असा आहे की जर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे एखाद्याचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण राहणार या प्रश्नावर बोलताना पालिका प्रशासन तसेच पीडब्ल्यूडी विभागाने देखील उत्तर देण्याचे टाळले आहे. मात्र नागरिकांचे बळी जाऊनही त्याचा काहीच परिमाण झाल्याचा दिसून येत नसून आजही भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्यांची खड्डे जैसे थे आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे आता मृत्यूचे सापळे बनले असून नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. ठाणे जिल्ह्यात खड्ड्यामुळे मागील दोन महिन्यात सहा जणांचा बळी गेला. त्यापैकी चार जणांचा बळी भिवंडीत गेला आहे. कल्याण आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी एक बळी खड्ड्याने घेतला आहे. तर भिवंडी वाडा महामार्गावर निष्कृष्ट आणि खराब रस्त्यामुळे मागील सात वर्षात 400 जणांचा बळी गेला आहे. मात्र एवढे बळी गेल्यानंतर देखील प्रशासनाला जाग का येत नाही असा सवाल विचारला जात आहे.
या अपघाताच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातारण पसरले असून त्यांनी खड्डे दुरुस्तीची मागणी करत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून खड्डे दुरुस्तीचे निवदेन देऊन मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापही ग्रामीण आणि शहरी भागातील खंड्याची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासन आणखी किती नागरिकाचे खड्यामुळे बळी घेतल्यानंतर खड्डे दुरुस्ती करणार असा संतप्त सवाल नागरिक करत असून आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अपघाताच्या घटना
1) घटना 5 जुलै 2022
रोड - काजू पाडा, घोडबंदर रोड
मृत्यू - सुफीयान शेख (दुचाकीस्वार)
2 ) घटना 16 जुलै 2022
रोड - मुंबई नाशिक महामार्ग , खारेगांव ब्रिज
मृत्यू - दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
3 ) घटना 16 जुलै 2022
रोड - कल्याण-बदलापूर ,खोणी
मृत्यू - अंकित थैवा (दुचाकीस्वार)
4) घटना 23 जुलै 2022
रोड - मुंबई नाशिक महामार्ग , राजनोली
मृत्यू - ब्रिजेशकुमार जैसवार (दुचाकीस्वार)
5) घटना 07 ऑगस्ट 2022
रोड - भिवंडी-वाडा रोड, नदी नाका
मृत्यू - अशोक काबाडी (दुचाकीस्वार)
6) घटना 16 ऑगस्ट 2022
रोड - भिवंडी-वाडा रोड, कुडूस -पालघर
मृत्यू - सईद पठाण (दुचाकीस्वार)