(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Maharashtra New CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले. मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही.
Maharashtra New CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) निकाल लागून 10 दिवस झाले. मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही. नवीन सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले आहे. 5 डिसेंबर रोजी नवीन सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. याआधी महाराष्ट्रातील महायुतीतील घटक पक्ष एकत्र बसून सरकारस्थापनेबाबत चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार की मंत्र्यांचाही एकत्र शपथविधी होणार हे ठरवण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप अधिकृत जाहीर झालेले नसले तरी सरकारस्थापनेची संपूर्ण तयारी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नवीन महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यामुळे राज्यात सर्वजण मुख्यमंत्रिपदी कोण असणार?, कधी नाव जाहीर करणार?, याबाबत चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीसांकडून शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला जात आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच अंतिम मंजूरी मिळणे निश्चित असल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. महायुतीचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अजित गटाने यापूर्वीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपापल्या पक्षांचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते नाशिकमध्ये असून शपथविधी सोहळ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. आमचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीची बैठक आणखीन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स संपवून टाकला आहे. अजित पवारांनी सांगितलं की, दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत भाजपचे मुख्यमंत्रिपद घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार म्हणाले की, "बैठकीत (महायुतीच्या नेत्यांची दिल्ली बैठक) महायुती भाजपचे मुख्यमंत्री आणि उर्वरित दोन पक्षांच्या उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करेल, असं ठरलं होतं. विलंब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जर तुम्हाला आठवत असेल तर 1999 मध्ये सरकार बनायला एक महिना लागला होता."