(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole: बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Nana Patole: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या फक्त 16 जागा निवडून आल्या आहेत. या दारुण पराभवानंतर नाना पटोले यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
नागपूर: नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात आरएसएसचे मुख्यालय असल्याने तिथे काँग्रेस पराभूत व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जाणूनबुजून पक्ष संघटन कमजोर ठेवले. मला कुठली मदत न केल्याच्या आरोपाचा ही पुनरुच्चार बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी केला आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेस आहे. मात्र, मी नाना पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा शिपाई आहे, असेही बंटी शेळके म्हणाले. दरम्यान बंटी शेळकेंच्या माध्यमातून काँग्रेसमधील नाना पटोले विरोधी गट विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाबद्दल नाना पटोलेंवर हल्ले करत असल्याचे ही चित्र आहे.
नेमके काय म्हणाले बंटी शेळके?
मला मिळालेल्या कारणे दाखवा नोटिसीसंदर्भात मी उत्तर दिलं आहे. त्यांना मी जे जाब विचारले होते, त्याचे उत्तर मला मिळालेले नाही.
निवडणुकी काळात जर मी असे प्रश्न विचारले असते, तर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असते, त्यामुळे तेव्हा असे आरोप लावले नाही.
सन्माननीय आरएसएस एजंट नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरी बॉर्डरवर आरटीओ विरोधात आंदोलन केलं. तेव्हा नाना पाटोळे यांनी पाठिंबा दिला नाही.. उलट माझ्यावर हल्ला झाला, तेव्हा ही नाना पटोले एकही शब्द बोलले नव्हते, याकडे बंटी शेळके यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नाना पटोले यांची कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना असते. मी संघ मुख्यालयसमोर आरएसएसचे गणवेश जाळले. मात्र, त्यावेळेस नाना पटोले एकही शब्द बोलले नाही. लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर नाना पटोले एकही शब्द बोलले नाही तेव्हा ते कुठे गेले होते. मागील विधानसभा निवडणुकीत मी फक्त 4000 मतांनी पराभूत झालो असताना. यंदा नाना पटोले यांनी तीन जणांचे नाव प्रदेश कार्यालयातून मध्य नागपुरातून उमेदवारीसाठी पाठवले होते, त्यात जाणूनबुजून माझे नाव उमेदवार म्हणून नाव टाकले नव्हते. प्रियंका गांधी माझ्या प्रचारासाठी येत असताना तिथे नाना पटोले आले नाहीत. माझ्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून कुठलीही ताकद उमेदवार म्हणून मला दिली नाही. माझ्यावर कारवाई झाली तेव्हा काँग्रेसचे वकील सेल कुठे गेले होते, असा सवाल बंटी शेळके यांनी उपस्थित केला.
भाजपचे उमेदवार प्रवीण दटके हे इरफान काजी नामक व्यक्ती ला बोलावून 20 लाख रु देतात. पण त्या व्यक्तीने ते पैसे घेतले नाही. नाना पटोले त्याला म्हणतात तुझी उमेदवारी पक्की आहे. या संदर्भात येत्या काही दिवसात अनेक खुलासे करणार असल्याचा दावा ही बंटी शेळके यांनी केला. आरएसएस एजंट नाना पटोले तुम्ही यांनी माझी नस कापली तर त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच लिहिलेले दिसेल. भाजपचे बावनकुळे यांच्या मुलाच्या अपघात प्रकरणातही नाना पाटोले यांच्या खास लोकांनी आवाज उठवला नाही. संघ मुख्यालय, नितीन गडकरी यांचे घर मध्य नागपूर मतदारसंघात असल्यामुळे ही जागा भाजपने जिंकावी यासाठी नाना पटोले यांनी काम केलं आणि संघटन कमजोर केलं असा आरोपही बंटी शेळके यांनी केला. राहुल गांधी यांच्यापर्यंत ही सर्व माहिती पोहोचलेली आहे. हा आमच्या परिवारातील विषय आहे, असेही बंटी शेळके यांनी म्हटले.
गंडातर टाळण्यासाठी नाना पटोले दिल्लीत ठाण मांडून बसले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. विधानसभा निकालाचा आढावा आणि पक्षा अंतर्गत वाढत चाललेले कुरघोडीचे राजकरण याची माहिती पक्षश्रेठींना देण्यासाठी नाना पटोले दिल्लीत पोहोचले आहेत. पक्षांतर्गत विरोधकांच्या प्रदेशअध्यक्ष हटाव मोहिमेला नाना पटोले यांच्याकडून काउंटर केले जात आहे. पक्षश्रेठींच्या भेटी घेऊन नाना पटोले मांडत आपली बाजू मांडत आहेत.
आणखी वाचा