Bhiwandi : भिवंडीतील रेड लाईट एरियातून सहा बांगलादेशी महिला ताब्यात, पोलिसांची कारवाई
Thane Police Action : भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात देहव्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती आहे. त्या ठिकाणी कारवाई करून सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ठाणे : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर क्रूर अत्याचार सुरू असल्याने त्याच्याविरोधात भारतात आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असणाऱ्या हनुमान टेकडी या रेड लाईट एरियात ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सहा बांगलादेशी महिलांची धरपकड करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्याचे सक्त आदेश ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने दुपारच्या सुमारास शहरातील हनुमान टेकडी येथील रेड लाईट एरियात छापेमारी केली. त्या ठिकाणच्या असंख्य खोल्यांमधील महिलांची झाडाझडती घेतली.
पोलिसांच्या या कारवाईत सहा महिलांकडे भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे अधिक चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले. या महिलांना ताब्यात घेऊन स्थानिक भिवंडी शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस ठाण्याच्या ताब्यात महिलांना देण्यात आले आहे.
या परिसरात पोलिस विभागाने बऱ्याच काळानंतर अशी कारवाई केली आहे. पण यंत्रणेने एवढ्या वर न थांबता बांगलादेशी महिलांना आश्रय देणारे, त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेणाऱ्यांविरोधात सुद्धा कारवाई करण्याची मागणी सजग नागरिकांनी केली आहे.
ही बातमी वाचा: