बंदुकीचा धाक दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा संस्थाध्यक्ष गजाआड, भिंवडीत गुन्हा दाखल
मुंबईला सामाजिक कामाच्या बहाण्याने कार घेऊन येत भिवंडी तालुक्यातील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजच्या खोलीत पीडितेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला
Bhiwandi Crime News: बंदुकीचा धाक दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा एका सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाला कोनगाव पोलिसांनी धुळे शहरातून बेड्या ठोकल्या आहे. कपिल वाल्मिक दामोदर (वय, 38) असे अटक आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे अटक आरोपी हा रिपाई आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या नेत्याचा मुलगा आहे. मात्र मुलाच्या वाईट वृत्ती आणि बदनामीकारक कारनाम्यामुळे वडिलांनी त्याला पूर्वीच घरातून काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरात रहाणारी आहे. तर आरोपी कपिल हा धुळे शहरात पत्नीसह राहतो. तो धुळे जिल्ह्यातील एका सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असून त्या माध्यमातून तो विविध सामाजिक कार्यक्रम राबवायचा. दोन महिन्यांपूर्वीच आरोपी कपिलने धुळे शहारत महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पीडित महिला त्या कार्यक्रमात गेली असता, तिथे तिची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन आरोपीला तिने आपण पतीपासून विभक्त राहत असल्याचे सांगितले. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याने पीडित महिलेशी जवळकी साधली.
त्यानंतर मुंबईला सामाजिक कामाच्या बहाण्याने कार घेऊन येत भिवंडी तालुक्यातील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजच्या खोलीत पीडितेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मात्र या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित महिलेला त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळ मारून नेली. त्यानंतर पीडित महिलेवर भिवंडी, कल्याण परिसरातील लॉज नेऊन आरोपी दोन महिन्यापासून वारंवार अत्याचार करत होता. दरम्यान पीडित महिलेला कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर आरोपी घेऊन आला होता. त्यावेळी पीडित महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता, तो टाळाटाळ करीत असल्याचे पीडितेच्या लक्षात आल्यावर तिने 1 फेब्रुवारीला कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडलेला प्रसंग महिला पोलीस अधिकाऱ्याकडे कथन करताच आरोपी कपिलवर कोनगाव पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कालमानुसार गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक शेणवे , पोलीस हवालदार सुनील पाटील , पोलीस शिपाई, कुशल जाधव या पथकाने धुळे शहरातून आरोपीला2 फेब्रुवारीला सापळा रचून अटक केली. आरोपीला 3 फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीने ज्या बंदुकीने धाक दाखवून पीडित महिलेवर अत्याचार केला. त्या बंदुकीचा आरोपीकडे शासकीय परवाना असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.