Bhiwandi Accident : कंटेनरच्या धडकेत प्रवासी जीप 60 फूट दूर फेकली गेली, भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू
Bhiwandi Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील खडवली गावाच्या क्रॉसिंगवर कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
Bhiwandi Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील खडवली गावाच्या क्रॉसिंगवर कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. काळी पिवळी प्रवासी जीपला भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने प्रवासी जीप साठ फूट दूर फेकली गेली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कसा झाला अपघात?
मुंबई-नाशिक महामार्गावर खडवली फाट्याजवळ हा अपघात झाला. ही प्रवासी जीप खडवली स्टेशनच्या दिशेने जात होती. जीपमध्ये काही विद्यार्थी देखील होते.खडवली फाट्यावर क्रॉसिंगजवळ वळण घेत असताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जीपला जोरदार धडक दिली. यात प्रवासी जीप जवळपास 50 ते 60 फूट दूर फेकली गेली. अपघातात जीपमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी जीप चालक अतिशय गंभीर जखमी असून त्याला उपचारांसाठी कळव्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर उर्वरित तीन जणांवर निधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी पंचनामा करत चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
खडवली फाटा हा अपघाताचं ठिकाणं बनलं आहे. त्यामुळे प्रशासानाने लवकरात लवकर उपाय करावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
भिवंडीत रिव्हर्स घेताना कारच्या खाली येऊन चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
बेजबाबदार चालकाने व्हिडीओ पाहण्याच्या धुंदीत कार रिव्हर्स घेतली आणि त्या कारच्या मागच्या चाकाखाली एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत मागील महिन्यात घडली होती. सद्दाम असं कार चालकाचं नाव आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात कार चालकावर गुन्हा दाखल झाला होता. भिवंडी शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या बागे युसूफ या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या समसुल्लाह मंसूरी यांच्या मुलाचा निकाह सभारंभ 5 जून रोजी होता. या समारंभात सोसायटीच्या आवारात एकीकडे समारंभाचा कार्यक्रम सुरु असतानाच एका बेजबाबदार कारचालकाने कारची काच लावून व्हिडीओ पाहत असतानाच कार मागे घेतली. या कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षाची चिमुरडी कारच्या मागील चाकाखाली येऊन चिरडली गेली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला
हेही वाचा