Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
Gas Leakage in Ambernath: अंबरनाथ एमआयडीसीत केमिकल कंपनीतून वायू गळती. गॅस संपूर्ण शहरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तर वायू गळती आटोक्यात आल्याने नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन. वायूगळती थांबली
अंबरनाथ: ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठी रासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरा वायूगळती (Chemical Gas Leakage) झाली. संबंधित कंपनीने जाणीवपूर्वक वायू सोडला की चुकून वायूगळती झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात (Ambernath News) धुराचे साम्राज्य पसरले होते. हा धूर मध्य रेल्वेच्या रुळांपर्यंत येऊन पसरला होता. इतक्या मोठ्याप्रमाणावर शहरात धूर पसरल्याने अनेक नागरिकांना त्रास झाल्याची माहिती आहे. मात्र, हा धूर किंवा वायू कसा पसरला, याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या गॅस गळतीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी रात्री साधारण दहाच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीच्या परिसरात उग्र वास येऊ लागला. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास जाणवू लागला. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोडवर वायू मोठ्याप्रमाणावर पसरला होता. त्यामुळे नागरिकांना अग्निशामन दलाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तपास आणि चौकशी केली असता एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीतून गॅस सोडण्यात आला नाही, असे सांगण्यात आले. मात्र, अंबरनाथ परिसरात प्रचंड धूर पसरला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
वायूगळतीमुळे अंबरनाथच्या रहिवाशांना त्रास
अंबरनाथ MIDC परिसरातील मोरीवली येथील निकाकेम केमिकल कंपनीतून केमिकल हवेत पसरल्याने नागरिकांच्या घशात खवखव आणि डोळ्यात जळजळ होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात केमिकल पसरले होते.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती वर नियंत्रण मिळवले. निकाकेम केमिकल कंपनी ही दिवसा सुरू असते, रात्री कंपनी बंद असते. कंपनीच्या आवारात ऑइलचे ड्रम ठेवण्यात आले आहेत. उष्णतेमुळे यात केमिकल मिश्रण झाल्याने हवेत वायू पसरला असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
VERY CONCERNING!
— Siddharth (@SidKeVichaar) September 12, 2024
A gas leak at a chemical company in Ambernath has spread across the city, causing reduced visibility, itchy eyes, and throat irritation for residents.#Maharashtra
pic.twitter.com/x4OHAy7VLJ
वायू प्रदूषण मंडळाच्या मोबाईल व्हॅनकडून सध्या हवेची तपासणी सुरु आहे. नेमका वायू कोणता आहे याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस ,एमआयडीसी अग्निशमन दल आणि वायू प्रदुषण मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. परिस्थिती आटोक्यात आली असून घाबरून जाण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा
Ambarnath News : विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, अंबरनाथ येथील घटना