(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray on Eknath Shinde : रडून सगळं मिळवायचं, थोड्या दिवसांनी बोलतील मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो; आदित्य ठाकरेंचा बोचरा वार
आदित्य ठाकरे यांची महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र यात्रा आज (18 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचली. यावेळी बोलताना आदित्य यांनी कडाडून हल्ला चढवला.
ठाणे : 2022 मध्ये शिवसेना आणि 2023 मध्ये राष्ट्रवादी भाजपने फोडली, हे करून देखील महाराष्ट्राला काय मिळाले? जानेवारी महिन्यात वायब्रांत गुजरातमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक त्यांनी घेतली, पण 3 पक्ष आणि एक परिवार फोडून त्यांनी काय मिळवलं? अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आदित्य ठाकरे यांची महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र यात्रा आज (18 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचली. यावेळी बोलताना आदित्य यांनी कडाडून हल्ला चढवला. तुमच्या माथ्यावर लिहिलेला गद्दार, बाप चोर हा शिक्का तुम्ही कधीही पुसू शकणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
आणि एक महिन्यात ते भाजप सोबत गेले
आदित्य ठाकरे म्हणाले की, 20 मे 2022 रोजी हे असेच वर्षा बंगल्यावर आल्यानंतर रडत होते. भाजप मला आत टाकेल, मला जमणार नाही, असे म्हणत होते आणि एक महिन्यात ते भाजप सोबत गेले. ते पुढे म्हणाले की, एका निर्लज्ज माणसाने, ज्याला आधीपासून विधानसभा तिकीट एमएसआरडीसी, नगरविकास खाते दिले, उध्दव साहेबांनी विश्वास ठेवला, पण याच माणसाने विश्वासघात केला.
ते पुढे म्हणाले की, ठाण्यात आल्यावर मन भरून येतं, जुन्या आठवणी येतात, 1994 आसपास, घरात आनंदाचे वातावरण होते, आजी खुश होती, दिघे फटाके फोडत होते. असे आठवले की वाटते गद्दार गेले ते गेले पण शिवसैनिक इथेच आहेत. इथं महिलांचे कार्यक्रम जास्त झाले आहेत. महिलांचा उध्दव ठाकरे यांच्यावर जास्त विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
हल्ली नवी पद्धत झाली आहे, खोटे बोला पण रडून बोला. कालचे अधिवेशन हे यासाठी होते की मी किती अपयशी आहे हे मुलाने सांगितले. हे मी खूप वेळा बघितले आहे, रडून सगळे मिळवायचे. थोड्या दिवसांनी बोलतील मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो, पण एक माणूस म्हणून पण अपयशी ठरले आहेत, गेल्या दीड वर्षात एकही नवीन उद्योग आला नाही. इथून एक एक गोष्ट गुजरातला पाठवत आहेत. थोड्या दिवसांनी हे मंत्रालय देखील गुजरातला हळवतील. आज जो विकास होतोय तो यांच्या बिल्डर मित्राचा होत आहे. हे विकास आणत नाहीत, दिल्लीत जातात ते स्वतः साठी जातात.
अनेक वर्ष तुम्ही देखील पाहिले, कधी पासून ते शेतकरी झाले, गेल्या पाच वर्षात त्यांची जमीन किती वाढली हे पण बघा, तिकडे गावात जायला रस्ता नाही. हे फक्त अमावस्या किंवा पौर्णिमेला शेती करतात, नक्की कसली शेती हे करतात, अनेक जण सोलार शेती करतात, पण हे लूनार शेती कसली करतात हे बघायला हवे, अशी टीकाही त्यांनी केली.