एक्स्प्लोर
क्रेडिट कार्ड वापरताना 'या' चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!
मुंबई: भारतातील सुमारे 35 कोटीहून अधिक नागरिक डेबिट कार्डचा वापर करतात. त्यापैकी सुमारे दोन कोटी नागरिक क्रेडिट कार्डधारक आहेत. एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटीबँक आणि अमेरिकन एक्स्प्रेस या भारतात क्रेडिट कार्ड देणाऱ्या पाच मोठ्या बँका आहेत. प्रत्येक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग अवलंबतात. त्यामुळे ग्राहकही आकर्षित होतात.
मात्र, कमी कालावधीच्या उधारीसाठीच क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. जर तुम्ही तुमची थकबाकी वेळेत भरली नाही, तर त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना आवश्यक अशा चार गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
1. वेळेत पेमेंट करा : समजा तुमचं बिल आलं आणि पैसे भरण्याची मुदत 30 तारीख असेल, तर मुदतीत पैसे भरणं आवश्यक आहे. तुमचा पगार एक- दोन तारखेला असेल, त्यामुळे तुम्ही 30 तारखेपर्यंत पैसे भरू शकला नाही, तर त्याचा फटका बसू शकतो. कारण फक्त लेट पेमेंट चार्जेस आणि तीन टक्के व्याज द्यावं लागेल, असा तुमचा अंदाज असतो. मात्र तुम्हाला मासिक व्याजासह लेट पेमेंट हे वर्षाच्या व्याज दराच्या हिशेबाने द्यावं लागेल. हा व्याज दर 36 टक्क्यांपर्यंत असू शकतो.
2. क्रेडिट लिमीटपेक्षा जास्त खर्च नको: तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत खरेदी करणं फायदेशीर आहे. कारण तुम्ही खरेदीची मर्यादा ओलांडली, तर बँक तुमच्याकडून 500 रुपये जादा चार्ज वसूल करेल. इतकंच नाही तर अतिरिक्त केलेल्या खरेदी दरावर सुमारे 2.5 टक्के वेगळं व्याज आकारेल.
3. फ्री क्रेडिट कार्ड : बँका बहुतेकवेळा क्रेडिट कार्ड फ्री असून, त्यांचे कोणतेही चार्जेस नसल्याचं सांगतात. मात्र हे कार्ड फक्त पहिल्या वर्षासाठी फ्री असतं. त्यानंतर कार्डचे चार्जेस लागू केले जातात किंवा काही छुपे चार्जेस आकारले जातात. जसे 2.5 टक्के फ्युअल चार्ज, ईएमआयसाठी प्रोसेसिंग फी वगैरे.
4. कमी क्रेडिट लिमीटचे जास्त क्रेडिट कार्ड - काही लोक कमी क्रेडिट लिमीटचे जास्त कार्ड घेतात, मात्र अशी चूक कधीही करू नये. त्याऐवजी एकच जास्त लिमीटचे कार्ड घेणं फायद्याचं ठरेल. जास्त कार्ड घेतल्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बँक क्रेडिट लिमिट वाढवत नाही, पण दुसरं कार्ड देण्यासाठी तयार असते. मात्र तुम्हाला या वेगवेगळ्या कार्डवर वेगवेगळं व्याज द्यावं लागतं.
क्रेडिट कार्डमुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात, मात्र याच्या अंधाधुंद वापरामुळे अनेक अडचणी येतात. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या वापरादरम्यान, या चार गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement