(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hashtags : #टॅग काय आहे? सोशल मीडियावर पोस्ट करताना हॅशटॅग का वापरतात?
Social Media Trends : तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया साईटवर हॅशटॅगचा वापर होताना पाहिला असेल. पण Hashtag का वापरतात हे तुम्हाला माहित आहे का?
Use of Hashtags on Social Media : सोशल मीडियावर (Social Media) वेळोवेळी वेगवेगळे ट्रेंड्स (Trends) किंवा हॅशटॅग (Hashtags) पाहायला मिळतात. तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #टॅग (#tags) चा वापर होताना पाहिलं असेल. तुम्हीही कधी-कधी सोशल मीडियावर हॅशटॅगचा वापर केला असेल. पण Hashtag का वापरतात हे तुम्हाला माहित आहे का? किंवा #टॅग वापरण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.
हॅशटॅग काय आहे? ( What is Hashtag )
सोशल मीडिया हे फार मोठं व्यासपीठ आहे, जिथे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक एकमेकांसोबत जोडले जातात. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि कू तसेच इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅगटॅगचा वापर सर्रास केला जातो. तुम्हीही असे वेगवेगळे हॅशटॅग वापरत असाल. हॅशटॅगचा वापर टॅग करण्यासाठी म्हणजे एका पोस्टला दुसऱ्या पोस्टसोबत जोडण्यासाठी केला जातो. हॅशटॅगमुळे तुम्हाला त्या विषयासंबंधित सर्व पोस्ट, व्हिडीओ किंवा कमेंट पाहता येतात. हॅशटॅग एका पोस्टला त्याच विषयावरील दुसऱ्या संबंधित पोस्टला जोडण्याचं काम करते. हॅशटॅगवर क्लिक केल्यावर तुम्हाला त्यासंबंधित सर्व पोस्ट एकाच ठिकाणी पाहता येतात. 1988 साली इंटरनेट रिले चॅट नावाच्या प्लॅटफॉर्मवर हॅशटॅगचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता.
असा होतो हॅशटॅगचा फायदा
सोशल मीडियामुळे जगाच्या एका टोकावरील लोक दुसऱ्या टोकावरील व्यक्तीसोबत जोडले जातात. अशा वेळी हॅशटॅगमुळे तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींची माहिती मिळते. या हॅशटॅगचा वापर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखादा फोटो, व्हिडीओ, पोस्ट किंवा कमेंट शोधण्यासाठी केला जातो. तुम्ही अनेक वेळा ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साईटवर एखादा हॅशटॅग ट्रेंड होताना पाहिला असेल. जेव्हा एकाहून अनेक व्यक्ती एकसारख्याच मुद्द्यावर एखादी पोस्ट करतात किंवा प्रतिक्रिया देतात, तेव्हा त्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होतो. यामुळे जगभरातील लोकांची प्रतिक्रिया सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
या #टॅग अशाप्रकारे काम करतं
- अनेक यूजर्स कोणताही फोटो, व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करताना हॅशटॅग वापरतात, परंतु हॅशटॅग सर्वच शब्दांवर लागू होत नाही.
- हॅशटॅग फक्त अल्फान्यूमेरिक म्हणजे वर्णमालेतील शब्दांसोबत वापरता येतो.
- हॅशटॅगसह स्पेशल कॅरेक्टर वापरल्यास ते काम करत नाही.
- हॅशटॅग वापरण्यापूर्वी, तुम्ही टॅग करत असलेला शब्द तुमच्या पोस्टशी संबंधित आहे की नाही हे पाहा.
- तुमच्या पोस्टशी संबंध नसलेला टॅग तुम्ही वापरू नका.
- तुम्ही कोणत्याही फोटोवर किंवा पोस्टवर हॅशटॅग वापरल्यास ती पोस्ट अपलोड केल्यावर कोणत्याही युजरला तो फोटो किंवा ती पोस्ट पाहता येईल.
- तुमच्या वैयक्तिक पोस्टवर हॅशटॅग वापरणं टाळा.