एक्स्प्लोर
INDvsAUS | टीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, रोहित, विराटची शानदार फलंदाजी
भारतीय संघाने पहिला सामना गमावल्यानंतर सलग दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. रोहित शर्मा आणि विराटच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला.
बंगळुरु : रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला 287 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि चेंडू राखून पार केलं. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रोहितनं शतक झळकावलं. तर कर्णधार विराट कोहलीचं मात्र शतक हुकलं. विराट आणि रोहितनं दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची निर्णायक भागीदारी साकारली. रोहितनं 119 तर विराटनं 89 धावांची खेळी केली.
त्याआधी स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत नऊ बाद 286 धावांची मजल मारली होती. स्मिथनं कारकीर्दीतलं नववं वन डे शतक साजरं करताना 131 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय मार्नस लाबुशेननंही 54 धावांचं योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. रविंद्र जाडेजानं दोन तर कुलदीप यादव आणि नवदीप सैनीनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय डावाची सुरुवातही चांगली झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर विराट आणि रोहित जोडीने चांगलाच जम बसवला. रोहित शर्माने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं. रोहित-विराट जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असताना रोहित झॅम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने तुफान फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणलं. मात्र 89 धावांवर असताना हेजलवूडच्या गोलंदाजीवर विराट बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, बंगळुरु वन डेत रोहित शर्मानं विक्रमी शतक झळकावलं. रोहितनं 128 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांसह 118 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे 29वं शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकत सर्वाधिक शतकवीरांच्या यादीत चौथ्या स्थानी झेप घेतली. या यादीत सचिन तेंडुलकर सर्वाधिक 49 शतकांसह पहिल्या, विराट 43 शतकांसह दुसऱ्या तर रिकी पॉन्टिंग 30 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement