(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon: रेशीम शेतीने शेतकऱ्याला दिली आर्थिक साथ; जामनेरचा शेतकरी ठरतोय इतरांसाठी आदर्श
केळी, कापूस पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील देव पिंपरी गावच्या नाना पाटील या शेतकऱ्याने रेशीम शेतीमध्ये लाखो रुपयांची कमाई करून दाखवत परिसरातील शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
Agriculture News: जळगाव जिल्हा केळी (Banana) आणि कपाशीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र गेल्या काही वर्षांत या दोन्ही पिकांमध्ये शेतकऱ्यांना (Farmers) सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी आता नवीन वाटा शोधायला सुरुवात केली आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देव पिंपरी गावच्या नाना पाटील यांनी रेशीम शेतीचा (Silk Farming) पर्याय शोधून काढला. रेशीम शेतीच्या माध्यमातून ते दरमहा 80 हजार रुपयांची कमाई करत आहेत. परिसरातील अन्य शेतकऱ्यांपुढे त्यांनी आपला आदर्श ठेवला आहे
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देव पिंपरी गावचे नाना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती आहे, वाडवडिलांपासून जोपासलेल्या शेतीत ते केळी (Banana) आणि कापूस (Cotton) पिकाची पारंपरिक पद्धतीने शेती करत होते, मात्र गेल्या काही वर्षांत त्यांना ही दोन्ही पिकं घेताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. कधी मजुरांची अडचण, तर कधी रोगराई, तर कधी पिकाला भाव मिळत नसल्याची अडचण, अशा अनेक अडचणीमुळे नाना पाटील यांना शेतीमध्ये मोठे नुकसान पाहायला मिळत असे.
दरवर्षी सातत्याने येणाऱ्या या अडचणींमुळे नाना पाटील यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या नातेवाईकांनी यश मिळवलेल्या रेशीम शेतीचा (Silk Farming) पर्याय निवडला. आपल्या पाच एकर पैकी त्यांनी दोन एकर क्षेत्रात रेशीम शेतीसाठी लागणाऱ्या तुतीची लागवड केली, त्यासाठी त्यांनी संपूर्ण पणे सेंद्रिय पद्धतीचा वापर केला. पाण्याचे आणि शेणखताचे योग्य नियोजन करुन नाना पाटील यांनी उत्तम दर्जाचा तुती पाला निर्माण करण्यात यश मिळवले.
तुतीची लागवड करून झाल्यानंतर आपल्या दोन एकर शेतीत त्यांनी 30 बाय 50 फूट अशा आकाराच्या शेडची रेशीम अळीसाठी उभारणी करून घेतली. यासाठी त्यांना एकूण पाच लाख रुपयांचा खर्च आला, मात्र शासन योजेनेतून तीन टप्प्यांत तो अनुदान म्हणून मिळाल्याने नाना पाटील यांना हा खर्च पूर्णपणे मोफत पडला.
रेशीम शेतीविषयी अगोदर कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी शासनाच्या योजनेतून रेशीम शेतीचे मार्गदर्शन मिळवले, शिवाय त्यांच्या नातेवाईकांच्या अनुभवाचा फायदा घेत रेशीम शेतीला सुरुवात केली. तुती पाल्याच्या प्रमाणानुसार त्यांनी कधी दोनशे अंडी पूंजी, तर कधी तीनशे अंडी पूंजीची ब्याच लावून त्यापासून कधी दोन क्विंटल, तर कधी तीन क्विंटल मालाची निर्मिती करण्यात यश मिळवले.
रेशीम अंडी कोषाला कधी पन्नास हजार, तर कधी ऐंशी हजार रुपये प्रति क्विंटल भाव त्यांना मिळत गेल्याने सरासरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्रति महिना नफा त्यांना मिळतो. रेशीम शेती नाना पाटील यांच्यासाठी चांगले आर्थिक उत्पन्न देणारे साधन बनल्याने रेशीम शेती हे शास्वत उत्पन्न असल्याचं नाना पाटील यांचं मत आहे.
पूर्वी केळी कापूस पिकासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट करूनसुद्धा पुरेसे उत्पन्न मिळत नसे, शिवाय मजूर टंचाईमुळे नेहमीच शेतीच्या कामाचं टेन्शन असायचं. वर्षभर मेहनत करुनही हातात काय राहील याचा भरवसा नव्हता, आता मात्र केवळ बावीस दिवसांत वर्षभर जेवढी कमाई दुसऱ्या पिकात होत नाही तेवढी कमाई रेशीम शेतीत होत आहे. रेशीम शेतीत मजूर देखील कमी लागत असल्याने एखाद्या सरकारी नोकरीपेक्षाही चांगल्या पद्धतीने पगारासारखे उत्पन्न मिळत असल्याचे नाना पाटील यांच्या पत्नी सुरेखा पाटील यांनी म्हटलं आहे.
नाना पाटील आणि सुरेखा पाटील या दाम्पत्याने रेशीम शेतीत मिळवलेल्या यशाची चर्चा संपूर्ण जामनेरसह जिल्ह्यात होऊ लागल्याने नाना पाटील यांच्या रेशीम शेतीचा पॅटर्न पाहण्याचा मोह राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनाहीआवरता आला नाही. नाना पाटील यांचा रेशीम शेतीचा प्रयोग समजून घेताना, रेशीम शेती एक आदर्श असून पारंपरिक शेतीसह आता नवीन प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
Beed News : गायरान अतिक्रमण प्रकरण तापणार; आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार अतिक्रमणधारकांना नोटीस