Ujani Dam: उजनी धरण नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येणार; जानेवारीपासून बोटिंग सुरु होणार
Ujani Dam: राज्यातील सर्वात जास्त साखर कारखाने अशी ओळख सोलापूर जिल्ह्याला मिळवून देण्यात उजनी धरणाचे मोठे योगदान आहे.
Ujani Dam सोलापूर: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात आता नवीन वर्षापासून बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार असून एक अध्यायावत पर्यटन स्थळ बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांची तहान भागवण्याचे काम करत असते. याशिवाय या विभागाला समृद्ध करण्याचे कामही उजनी धरणाने केले आहे.
आज राज्यातील सर्वात जास्त साखर कारखाने अशी ओळख सोलापूर जिल्ह्याला मिळवून देण्यात उजनी धरणाचे मोठे योगदान आहे. आता या उजनी धरणाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी जवळपास 282 कोटींचा आराखडा राबविण्यास सुरुवात होत आहे. यात पहिल्या टप्प्यात उजनी धरणामध्ये बोटिंगची सुविधा निर्माण करण्यात येत असून नवीन वर्षात जानेवारीमध्ये ही प्रत्यक्षात उतरणार आहे. यासाठी येत्या पंधरा दिवसात या स्पोर्ट्स बोटीन ची खरेदी पूर्ण होणार आहे.
स्पोर्ट्स बोट खरेदीसाठी 33 कोटींची निविदा एमटीडीसीकडून प्रसिद्ध झाली असून, जानेवारीअखेर प्रत्यक्ष बोटिंग सेवा सुरू होणार आहे. जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत उजनी जलपर्यटन प्रस्तावाला राज्य शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळाली असून, १९० कोटी पैकी स्पोर्ट्स बोटी खरेदीसाठी ३३ कोटींचे टेंडर झाली आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात क्रूज बोट, पॅरासेलिंग बोट, फ्लाइंग बोट, जेट स्की, हाऊस बोटी यांसह इतर स्पोर्ट्स बोटी खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यटन विभागाकडून जल पर्यटन सेवा सुरू होणार आहे.
उजनी धरण येथे पर्यटना साठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पुढच्या टप्प्यात 60 कोटी रुपयांचे रिसॉर्ट बांधण्यात येणार आहे. याशिवाय अॅग्रो टुरिझमसाठी ५० कोटींची निविदा देखील काढली जाणार आहे. उजनी जलपर्यटनासाठी १९० कोटी, कृषी पर्यटनासाठी १९ कोटी, तसेच विनयार्ड पर्यटनासाठी ४८ कोटी रुपये असे एकूण २८२ कोटी निधीला यापूर्वीच राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी यासाठी आवश्यक निधी देण्याचे आदेशही राज्य शासनाने काढले होते. यासाठी करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. आता लवकरच उजनी धरण एक पर्यटन केंद्र म्हणून महाराष्ट्राच्या नकाशा समोर येणार आहे.