सोलापूरकरांना उजनीतून पाणी कधी मिळणार? धरण आजवरची निचांकी पातळी गाठणार, जाणून घ्या पाण्याची स्थिती
Ujani Dam, Solapur : सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
Ujani Dam, Solapur : सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज (दि.5) यासंदर्भातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हे पाणी सोडल्यानंतर मात्र उजनी धरण त्याच्या इतिहासातील नीचांकी पातळीला पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूरकरांसमोर पाणी प्रश्नाने तोंड वर काढले आहे. उजणी धरणातून पाणी पुरवठा केल्यानंतर किती पाणी उरणार? उजनी धरणात सध्या किती पाणीसाठा आहे ? जाणून घेऊयात..
सोलापूर शहराला पुढील 50 दिवस पुरवावे लागणार
उजनी धरणात सध्या वजा 44 टक्के इतका पाणीसाठा उरला असून आता सोलापूर शहरासाठी चार गाळ मोरीतून 6 हजार क्युसेक विसर्गाने साडे पाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. सध्याची भीषण टंचाईची स्थिती , अनेक ठिकाणी पडलेले कोरडे पडलेले भीमा नदीचे पात्र यामुळे साधारण 20 मे पर्यंत हे पाणी सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी पोचण्याची शक्यता आहे. हे पाणी सोलापूर शहराला पुढील 50 दिवस पुरवावे लागणार असून यानंतर धरणातून पाणी सोडणे अशक्य बनणार आहे. सोलपूरसाठी हे पाणी सोडल्यावर उजनी धरण त्याच्या इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी म्हणजे वजा 60 टक्के इथपर्यंत जाणार आहे . यानंतर उजनी धरणावरील कोणतीही पाणीपुरवठा योजना चालू शकणार नाही. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 30 जून 2019 साली उजनी धरण वजा 58 टक्के पर्यंत नीचांकी पातळीला गेले होते.
जिल्ह्याधिकाऱ्यांचे पाणी टंचाईवर लक्ष
यंदा त्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली असून यंदा 20 मे रोजीच धरणं त्याच्या सर्वोच्य नीचांकी पातळीला पोचणार आहे. सोलापूर शहराला सोडलेले पाणी साधारण 5 जुलै पर्यंत पुरवून वापरावे लागणार असून यानंतर लगेच पाऊस सुरु न झाल्यास मात्र पाणी टंचाईची स्थिती अजून गंभीर बनणार आहे . यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क बनले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या टंचाईच्या स्थितीवर देखील बारीक लक्ष ठेवून आहेत . तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान होणार असून यानंतर मात्र प्रशासनाला टंचाईच्या परिस्थितीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray on Eknath Shinde : आनंद दिघेंचं वाक्य होतं गद्दारांना क्षमा नाही, राजन विचारेंचा विजय गद्दारांचे डिपॅाझीट जप्त करुन होणार, ठाण्यात ठाकरेंचा निर्धार