Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
Solapur Politics : सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सहा जागांवर दावा केल्याने महाविकास आघाडीत जोरदार खल सुरू आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर: सोलापूर जिल्हा हा पहिल्यापासून शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या वेळेला शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील सहा जागांवर दावा केल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 जागा असून गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ आणि माढा या दोन ठिकाणी आमदार निवडून आले होते. हे दोन्ही आमदार नंतर अजित पवार गटात गेले. त्यामुळे यावेळी शरद पवार गटाने माढा, मोहोळ, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघावर हक्क सांगितल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसचा पाच जागांवर दावा
काँग्रेसला केवळ अक्कलकोट शहरसह तीनच मतदारसंघ वाट्याला यायची शक्यता आहे. गेल्या वेळी काँग्रेसच्या जिल्ह्यात केवळ प्रणिती शिंदे या एकमेव आमदार होत्या. त्यामुळे मध्यची जागा सोडून काँग्रेसने यावेळी अक्कलकोट, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर व पंढरपूर, मंगळवेढा अशा पाच जागांवर दावा केला आहे. मात्र पवार गटाने पंढरपूर मंगळवेढा व दक्षिण सोलापूर या दोन जागांवर हक्क सांगितल्याने काँग्रेसच्या वाट्याला केवळ तीन जागा उरत आहेत .
तसे पाहता महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोलापूर मध्य व सांगोला या दोन जागा पाहिजे असून कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर सोलापूर मध्यमधून तर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख सांगोल्यातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
ठाकरेंचा सांगोल्यावर दावा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सर्वात जास्त वाईट अवस्था असून त्यांचा गेल्यावेळी केवळ सांगोल्यातील एकमेव आमदार विजयी झाला होता. सांगोल्यात जिंकलेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ देत उद्धव ठाकरेंना सोडचिट्टी दिली होती. आता उद्धव ठाकरेंनी सांगोल्याची जागा मागितली असून त्यांच्या वाट्याला फक्त बार्शी ही एकमेव जागा येत होती.
सांगोल्यातूनच घटक पक्षातील शेतकरी कामगार पक्षाचा वर्षानुवर्षाचा दावा असून येथून शेकापचे स्वर्गीय गणपतराव देशमुख हे तब्बल 55 वर्षे आमदार होते. ही जागा शरद पवार यांना गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला सोडायची आहे. मात्र आता या जागेसाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून सांगोल्याला गेल्या वेळी आमदार शिवसेनेचा असल्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे. या जागेसाठी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिलेली माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे नाव चर्चेत असून ही जागा शिवसेना घेण्यासाठी आग्रही आहे.
सध्याचे चित्र पाहता सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 जागांपैकी शरद पवार गटाने सर्वाधिक सहा जागांवर हक्क सांगितला आहे. यामुळे काँग्रेसकडे तीन आणि शिवसेनेला दोन जागा मिळू शकणार आहेत. यामुळे महाविकास आघाडी जोरदार घमासान सुरू असून शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या घटक पक्षांनाही वाटाण्याच्या अक्षता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातील जागा कमी करून काँग्रेस व शिवसेनेला द्याव्यात अशी या पक्षांची भूमिका आहे.
अजूनही महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोडे अडले असून यात सोलापूर जिल्ह्यातील वाद महत्त्वाचा ठरत आहे. काँग्रेस पक्षाला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जागा हव्या असून राष्ट्रवादीने माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला वगळता इतर सर्व जागा आधीच घेण्याची तयारी केली आहे. आता महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूर, सांगोला व सोलापूर मध्य हे तीन मतदारसंघ वादाचे मुद्दे बनले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावर ही काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांचाही दावा आहे.
येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावर महाविकास आघाडीत बंडखोरी अवलंबून असणार आहे. सध्या प्रत्येक मतदारसंघात पाच पेक्षा जास्त इच्छुक असून यातील किमान चार इच्छुक कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात उतरायच्या तयारीत आहेत. त्यामुळे या बंडखोरांचा महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसणार आहे.
ही बातमी वाचा: