Solapur : धक्कादायक! सोलापुरात चक्क पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
Solapur News Update : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली आहे. या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Solapur News Update : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तालुक्यातील पितापूर गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली आहे. या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र प्रशासनाने या गोष्टीकडं दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.
पितापूर गावातील नूर सायबअली भांडारी यांचं आज सकाळी निधन झालं. परंतु, अंत्ययात्रा काढण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्यात आली. बॅरलवर मृतदेह ठेवून जीव धोक्यात घालून नागरिकांनी ही अंत्ययात्रा काढली आहे. या अंत्ययात्रेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांतून प्रशासानाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील दृष्य अतीशय भयावह अशी आहेत.
हरणा नदीला पूर
अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला मोठा पूर आला आहे. या पूरामुळे पितापूर-अकतनाळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. हे गाव नदीच्या एका बाजूला आहे. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते आहे.
पितापूरमध्ये पूल उभारण्याची मागणी
पितापूर गावात हरणा नदीवर पूल नाही. त्यामुळे दर वर्षी पावसाळ्यात पूर आल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होते. त्यामुळे या नदीवर पूल बांधण्यात यावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांची मागणी आहे. परंतु, प्रशानाने गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आज जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आलीय.
अनेक वर्षांपासून नदीतून जीवघेणा प्रवास
अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावातील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नदी पलीकडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. आज देखील असाच जीवघेणा प्रवास पितापूरच्या गावकऱ्यांनी केलाय.
नेत्यांची आश्वासनं हवेत
गावकऱ्यांनी मागणी केल्यानंतर स्थानिक नेते आणि प्रशानाने पूल बांधण्याची अनेक वेळा आश्वासने दिली. परंतु, ही आश्वासने अद्याप हवेतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक व्यावहारासह अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. म्हणून तत्काळ या पूलाचे बांधकाम हाती घ्यावे अशी पितापूर गावकऱ्यांची मागणी आहे.
व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या