Radhakrishna Vikhe Patil : 'पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच', राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया
Maharashtra Solapur News: धनगर समाज सध्या आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक झाला आहे. यावेळी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देखील देण्यात आलं.
सोलापूर : पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे. सोलापुरातील धनगर समाज आरक्षण कृती समितीने धनगरांच्या मुद्द्यावर आक्रमक होत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला. यावर ट्विट करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषणाची हाक पुकारली. त्यानंतर सकल मराठा समाज हा आक्रमक झाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर धनगर समाजाने देखील आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील ?
राधाकृष्ण विखे पाटलांनी या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देत कोणताही रोष व्यक्त केला नाही. पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच झाला असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. तर भंडारा उधणाऱ्यांवर कोणताही कारवाई नको अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलीये. धनगर आरक्षणासंदर्भात ककृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील असल्याची भावना त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलीये.
पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच…
— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) September 8, 2023
भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको.
धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील!
नेमकं काय घडलं?
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवार (8 सप्टेंबर) रोजी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. त्यानिमित्ताने ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी अनेक लोकं त्यांच्या भेटीसाठी येत होते आणि आपले प्रश्न मांडत होते. त्याचवेळी धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आरक्षण देण्यासंदर्भात निवेदन देण्याची विनंती केली. हे निवदेन विखे पाटील स्विकारत असताना त्यांच्यावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. तर ज्या लोकांनी विखे पाटलांवर भंडाऱ्याची उधळण केली त्यांना कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.
धनगर आरक्षणाचा मुद्दा का कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. सध्या जालनामध्ये सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक जातींनी त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा देखील लावून धरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनगर समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे याच मुद्द्यावर निवेदन देण्याचा निर्णय आरक्षण समितीने घेतला. पण यामुळे काहीतरी वेगळचं घडल्याचं पाहायला मिळालं. तर फक्त भंडाऱ्याचीच उधळण केली तर मारहाण करण्याची काय गरज होती असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा :
मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणी; आक्रमक झालेल्या कृती समितीनं विखे पाटलांवर भंडारा उधळला