Solapur Crime: मोहोळमध्ये सराईत गुन्हेगाराने दहशतीसाठी रिव्हॉल्व्हरमधून हवेत बार काढला, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Solapur Crime: एकीकडे बीडमध्ये (Beed) ही मोहीम जोरदारपणे चालवली जात असताना, दुसरीकडे मोहोळ तालुक्यात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोलापूर: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार, हल्ले, कोयता गँगची दहशत, महिलांवरील अत्याचार अशा घटना समोर येत आहेत. अशातच मोहोळ (Mohol, Solapur) तालुक्यात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी प्रशांत तुकाराम भोसले सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. या गोळीबारानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संबधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.(Crime News)
मोहोळ तालुक्यातील खानवी गावातील प्रशांत भोसले याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीमधे काळया रंगाची स्पेटीग रायफल, 4 जिवंत काडसुते, राउंड, एक बनावट पद्धतीची पिस्टल, मॅगझिनमध्ये सात जिवंत काडतुसे राऊंड आढळून आले. प्रशांत भोसले याची माहिती घेतली असता, सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. प्रशांत भोसले सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे, दरम्यान पोलिस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे पिस्तुलसह 28 काडतुसे आढळून आली आहेत. पुण्याहून (Pune) हैदराबादला जात असतानाच्या प्रवासात हे शस्त्र आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केलं आहे. याप्रकरणी, पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचे भाजपच्या (BJP) बड्या नेत्यांसोबत फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पुण्याहुन हैद्राबादला निघालेल्या दिपक काटे नावाच्या प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तुल आणि 28 जीवंत काडतुसे आढळून आल्यानंतर पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दिपक काटेला अटक करण्यात आली आहे. दिपक काटेला पुणे विमानतळ पोलीस स्टेशनमधील पोलीसांच्या हवाली करण्यात आलंय. दिपक काटे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा रहिवाशी असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेचा संस्थापकही आहे. सोशल मिडीयावर त्यांचे अनेक भाजप नेत्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो दिसून येत असल्याने त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
बीडमधील 260 शस्त्र परवाने रद्द होणार?
बीड जिल्ह्यात 16 गुन्हे नोंद असलेल्याकडे शस्त्र परवाना असल्याचे समोर आले होते. शिवाय जिल्ह्यातील 260 जणांवर गुन्हा दाखल असून त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हे परवाने रद्द करण्यासाठी चालढकल केली जात होती. अखेर 26 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील गुन्हे नोंद असलेल्या तब्बल 260 जणांना नोटीस देण्यात आलीय. त्यामुळे हे शस्त्र परवाने रद्द होणार असल्याचे दिसत आहे.