सोलापुरात भाजपचे दोन आमदार आमने-सामने ,कल्याणशेट्टींना शह देण्यासाठी सुभाषबापूंची फिल्डिंग, पवारांचा जुना मोहरा हेरला
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Solapur Agricultural Produce Market Committee) निवडणुकीवरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Solapur : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Solapur Agricultural Produce Market Committee) निवडणुकीवरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kallyanshety) यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केल्यानंतर भाजप आमदार सुभाष देशमुखांकडूनही (Subhash Deshmukh) राजकीय फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे. पारंपारीक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांची सुभाष देशमुखांनी भेट घेतली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दोन भाजप आमदार आमने-सामने
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपचे दोन आमदार म्हणजे सचिन कल्याणशेट्टी आणि सुभाष देशमुख आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कालच सुभाष देशमुख यांनी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार विजयकुमार देशमुख यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हे एकमेकांच्या समोर उभे असल्यानं भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन पॅनल घोषित केलं आहे. त्यानंतर सुभाष देशमुख यांनी भाजप-काँग्रेस नेत्यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनल घोषित केलं आहे. मागील निवडणुकात विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याने आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत एकत्र येत पॅनेल उभे केले आहे. यावरुन सुभाष देशमुख यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेस (Congress) सोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय हे मला माहिती नसल्याचे सुभाष देशमुख ( MLA Subhash Deshmukh) म्हणाले होते. कोअर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला बोलावले नाही. मी कोअर कमिटीत आहे की नाही हे मला माहिती नाही. पण ज्या अर्थी मला बोलावलं नाही त्या अर्थी की कोअर कमिटीत नसेल असे देशमुख म्हणाले. भाजप काँग्रेस युती कोणाला मान्य नाही पण पार्टीने जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले असतील तर मला माहिती नाही असे देशमुख म्हणाले. त्यामुळं हे दोन्ही भाजप नेते या निवडणुकीवरुन आमने सामने आल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
सोलापुरात भाजप नेत्यांमध्ये 2 गट, आमदार कल्याणशेट्टींच्या नेतृत्वात भाजप-काँग्रेसचं पॅनेल, तर विरोधात सुभाष देशमुखांचं स्वतंत्र पॅनल
























