Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
Solapur Accident News : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुळेगाव तांडा परिसरात भीषण अपघात झाला.

Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Hyderabad National Highway) मुळेगाव तांडा परिसरात बुधवारी (दि. 18) सकाळी एक भीषण अपघात (Accident News) घडला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ॲसिडने भरलेल्या टँकरला जबर धडक दिली. या अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही संपूर्ण घटना महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरधाव कंटेनरने दुभाजक ओलांडून थेट समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिली. कंटेनरने धडक दिलेल्या टँकरमध्ये नायट्रिक ॲसिड भरलेले होते. अपघातानंतर टँकरमधून नायट्रिक ॲसिड बाहेर पडले.
नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
यामुळे नागरिकांना श्वास घेण्यात अडचणी येत आहेत. या अपघातात एका चालकाचा जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
भिवंडी-कल्याण मार्गावरील पाईपलाईन परिसरात कंटेनर पलटल्याने अपघात
दरम्यान, भिवंडी-कल्याण मार्गावरील (Bhiwandi Kalyan Road) पाईपलाईन परिसरात भीषण अपघात घडला आहे. कंटेनर रिव्हर्स घेत असताना कंटेनर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. राम लखन चव्हाण (48) असे मृत चालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर भिवंडीच्या दिशेने जात असताना चालकाने रिव्हर्स घेतला. मात्र मागील बाजू उंच असल्यामुळे तोल जाऊन कंटेनर पलटला आणि चालक त्यात अडकून दबला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे भिवंडी-कल्याण मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघातासंदर्भात पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























