Solapur : शहाजीबापूंच्या गावाची तहान भागवत आहे ठाकरे सेना, चिकमहुद गावाला युवासेनेच्या टँकरने पाणी पुरवठा सुरू
Shahajibapu Patil : शिवसेना ठाकरे गटावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गावाची तहान मात्र ठाकरे सेनेकडून भागवली जात असल्याचं चित्र आहे.
सोलापूर: शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil News) हे त्यांच्या वक्तव्यांसाठी किंवा विरोधकांवर करण्यात येणाऱ्या शेरेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे राजकीय डॉयलॉग चांगलेच व्हायरल होत असतात. तसेच त्यांच्या वेगळ्या स्टाईलमध्ये विरोधकांवर करण्यात येणारी टीका विरोधकांनाही चांगलीच झोंबते. पण राजकीय शेरेबाजी करणाऱ्या शहाजीबापू पाटलांच्या गावाची तहान मात्र ठाकरे सेनेकडून (Yuvasena) भागवण्यात येत असल्याचं चित्र आहे.
सांगोल्याचे फायरब्रॅन्ड आमदार म्हणून ओळख असलेले शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहुद गावाची (Shahajibapu Patil Chikmahud Village)तहान सध्या उद्धव ठाकरे यांची युवासेना भागवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत शहाजीबापूंची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू यांचे घर असलेल्या चिकमहुद या गावात ऐन पावसाळ्यामध्ये तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा युवासेनेने केला आहे. गावातील पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना मोलमजुरी करायचे सोडून पिण्याच्या पाण्यासाठी फिरावे लागत असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे नागरिकांची तहान भागवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेकडून स्वखर्चाने टँकर सुरू करण्यात आला असून गावात जागेवर जाऊन पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला गेला आहे. या भागाचे युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले हे स्वखर्चाने चिकमहुद येथे टँकरने पाणीपुरवठा करत गावाची तहान भागवत आहेत.
मतदारसंघाच्या विकासाच्या गप्पा मारणारे आमदार शहाजीबापू आता यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे. सध्या तरी सोलापूर जिल्ह्याला पावसाने ओढ दिल्याने सांगोला तालुक्यातील इटकी येथे पहिला सरकारी टँकर सुरू झाला आहे.
अजित पवार मंत्रिमंडळात आल्याने आनंदच
अजित पवारांच्या येण्यामुळे सरकार अजून गतीमान झाल्याचा विश्वास देखील शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आता तीनही पक्षांच्या आमदारांना सांभाळायाची जबाबदारी आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांची आहे.' तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत किमान 47 आणि विधानसभेत 225 जागा जिंकणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गटातील दोन ते तीन जेष्ठ आमदारांमध्ये नाराजी असल्याचा खुलासा आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. पण आता होणाऱ्या विस्तारात ती नाराजी संपेल असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा अलंकार आहेत आणि त्यांच्याचसारखे गावपातळीवर काम करणारे एकनाथ शिंदे आहेत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
ही बातमी वाचा: