विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
Pandharpur Vitthal Temple : मनसेच्या तालुकाध्यक्षाने मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचारी गुरूवारी काम बंद आंदोलन करणार आहेत. मंदिर समितीतील कर्मचाऱ्याला मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. काम बंद आंदोलनामुळे भाविकांचे कोणतेही हाल होणार नसल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
विठ्ठल मंदिरातील नित्योपचार विभागातील कर्मचारी वगळता सर्व विभागातील कर्मचारी गुरुवारी काम बंद आंदोलन करणार आहेत. मंदिर समितीच्या वतीने शशिकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कर्मचारी संघटनेने मागणी केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांची बुधवारी एक बैठक पार पडली. त्या बैठकीत मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला.
पुंडलिक महाराज थेटे यांना जीवे मारण्याची धमकी
तुम्हाला आमच्या राज ठाकरे साहेबांची अॅलर्जी आहे का असे म्हणत त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळाचे सदस्य हभप पुंडलिक महाराज थेटे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अहमदनगरमधील शेंडी गावात दिंडी मुक्कामी असताना अज्ञात व्यक्तीने थेटे महाराजांना फोनवरून धमकी दिली. याप्रकरणी सुरुवातीला अहमदनगरच्या कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग करण्यात आला.
संबंधित व्यक्तीने तुम्हाला आमच्या राज साहेब ठाकरे यांची अॅलर्जी आहे का? तुम्ही आता कुठे आहात? तुमचे लोकेशन पाठवा, तुमच्या तोंडाला आमचे अहमदनगरमधील कार्यकर्ते काळे फासतील असा दम दिला. तसेच तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या, नाहीतर जीवे मारून टाकीन अशी दिली धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकारामुळे वारकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
17 जुलै रोजी आषाढी
यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी होत असून यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
यावर्षी प्रथमच भंडीशेगाव , वाखरी या पालखी मार्गावरील इमारती , झाडांना आकर्षक विद्युत रोषणाई करून लाखो भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर पालखी सोहळे पंढरपुरात पोचल्यावर इसबावी , कॉलेज चौक , चंद्रभागा वाळवंट , भाविकांचे निवासस्थळ असणारे 65 एकरावरील भक्तिसागर अशा विविध ठिकाणी हे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यासाठी विविध जागांची पाहणी केली असून पालखी सोहळे येण्यापूर्वी ही विद्युत रोषणाई पूर्ण केली जाणार आहे.
ही बातमी वाचा :