Pandharpur : पुरातन आणि ठेवणीतल्या दागिण्यांमध्ये विठ्ठल-रुक्मिणी नटणार, नवरात्रीनिमित्त सौंदर्य जगाला दिसणार
Vitthal Mandir : नवरात्रीच्या निमित्ताने देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील या पुरातन दागिन्यांची डागडूजी आणि गाठविण्याचे काम करून घेण्यात आले आहे.
पंढरपूर: शारदीय नवरात्र काळात (Navratri 2023) रोज असे मौल्यवान दागिन्यांनी रुक्मिणी मातेला नानाविध रूपात सजविण्यात येते. याचवेळी विठुरायालाही अशाच पद्धतीने हिरेजडीत पुरातन मौल्यवान दागिन्यात नटवण्यात येत असते. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील या पुरातन दागिन्यांची डागडूजी आणि गाठविण्याचे काम करून घेण्यात आले आहे. आता घटस्थापनेपासून रोज यातील अनेक पुरातन आणि ठेवणीतल्या दागिन्यांमध्ये विठुराया आणि रुक्मिणीमातेचे सौंदर्य जगाला दिसणार आहे .
विठुराया हा लोकदेव, दोन हस्तक आणि पायावर मस्तक अशा भक्तीने लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. पण अलीकडच्या काळात देशभरातील भाविकांकडून देवाला भरभरून लाखो रुपयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांचं भरभरून दान देताना समोर येऊ लागले आहे. तसे गोरगरिबांचा देव अशी जरी विठूरायाची ओळख असली तरी देवाचा खजिना मात्र अनेक पुरातन अनमोल हिरे, पाचू, माणिक आणि अशी कितीतरी रत्नांच्या दागिन्याने भरून गेला आहे. विठूरायाची तुलना काही मंडळी तिरुपतीच्या बालाजीशी करायचा प्रयत्न करतात. मात्र हे दोन्ही देव एकच आहेत हे समजून घ्यायला ते कमी पडतात. म्हणूनच संत बहिणाबाई त्यांना समजण्यासाठी सांगतात,
सोन्या रूपांन मढला मारवाड्याचा बालाजी !
शेतकऱ्याचा इठोबा पानाफुलांमधी राजी !!
बालाजी इठोबा एकज रे देव !
गरिबीनं , सिरमितिनं केला केला दुजाभाव !!
विठुरायाच्या चरणी रंकांप्रमाणे अनेक राजे रजवाडे आणि सरदारांनीही मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. विठुरायाचा खजिना हा इतर कोणत्याही मोठ्या देवस्थानांपेक्षा नक्कीच कमी नाही. आज विठुरायाच्या खजिन्यात अत्यंत पुरातन आणि मौल्यवान हिरे, रत्ने, माणिक, पाचू अशा विविध अलंकारांची भर आहे. देवाच्या खजिन्यात देवाच्या शेकडो लहान मोठे दागिने असले तरी मुख्य 50 अलंकार आहेत. यात अत्यंत मौल्यवान कौस्तुभ मण्यासह अनेक दागिने कितीतरी वर्षापूर्वीचे आहेत. यांच्या नोंदीचा सापडत नाहीत.
अठराव्या शतकापासून दागिन्यांच्या नोंदी ठेवल्या जात असल्या तरी पूर्वीच्या काळातील असंख्य दागिन्यांचा काळ आजच्या सुवर्णकारांना देखील लागणे मुश्कील आहे. बडवे समाजाने ठेवलेल्या नोंदी प्रमाणेच 1985 पासून शासनाच्या मंदिर समितीने नोंदी केल्या आहेत. विठुरायाच्या खजिन्यातील 104 पुरातन मोती हिऱ्याचे पदक आणि पाचूचे लोलक असलेली मोत्याची कंठी... मोत्यांचा चौकडा जोड, 46 मोत्यांची कंठी ज्याच्या पदकात हिरे, माणिक असे अनमोल रत्ने जोडलेले आहेत. हिऱ्याची मंडोळी, 10 पेट्यांचा सुवर्ण कंबरपट्टा, माणकाचे पदक यात बसवलेले आहे. मौल्यवान हिरे आणि पाचू असलेली कंठी.. मत्स्य मकरावर जोड, 41 पानड्याचा हिऱ्यांचा हार, हिरे मंकणी जडावलेल्या मोठ्या बाहुभूषणे, हिरे , पाचू , माणिक याने जडवलेला शिरपेच .. तोरडी अर्थात हिऱ्यांचे पैंजण .. माणिक आणि हिरेजडित नाम , नीलमण्याचा नाम ... सोन्याचे पुरातन तोडे .. विविध प्रकारचे सोन्याचे टोप .. सोन्याचे कडे .. सोन्याचा चंद्रहार .. सोन्यात आणि हिऱ्यात जडवलेली मोहरांचा हार .. जवेची , बोरमाळ व पुतळ्यांच्या सोन्याचा हार .. सोन्याचे सोवळे , पागोटे असे असंख्य दागिने शेकडो वर्षे पुरातन असून यांच्या नोंदी सापडत नसल्याने हे खूप पुरातन अलंकार आहेत.
यात हिरे पाचू आणि मोत्यांनी जडवलेली सोन्याची बाजीराव कंठी हे शेवटच्या बाजीराव पेशव्यांनी अर्पण केलेली आहे. ग्वाल्हेरच्या जयाजीराव शिंदे यांनी हिरे पाचू यांनी मढवलेला लफ्फा अर्पण केलेला आहे. कोल्हापूरच्या राणीसाहेबानी देवाला नवरत्न हार दिलेला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी देवाला हिऱ्याची मोरमंडोळी दिली आहे. कोल्हापूरच्या राणी सकवारबाई यांनी देवाला हिऱ्याचे कंगन दिले आहेत. तंजावरचे श्रीमंत विजयवर्धा भोसले यांनी माणिक मोत्याची कंठी अर्पण केलेली आहे. हैदराबादचे राजा शिवराज बहाद्दूर यांनी पाचूंनी जडलेला कलगी शिरपेच अर्पण केला आहे. श्रीमंत राजमा राणीसाहेब व्यंकटगिरी यांच्यातर्फे हिरे माणिक जडवलेली कंठी दिलेली आहे. अगदी अलीकडे 1910 मध्ये बाळकृष्णबुवा अमळनेरकर यांनी सोन्याची तुळशीमाळ अर्पण केलेली आहे. अलिकडच्या काळात देखील असंख्य भाविक सोने आणि हिऱ्यांचे दागिने विठुरायाला अर्पण करीत असतात.
रुक्मिणी मातेचा खजिना देखील 82 अनमोल अलंकाराने सजलेला आहे . रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या सतराव्या शतकापासून असलेल्या अलंकारांच्या नोंदी सापडतात . रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यातील तब्बल 35 मौल्यवान अलंकार हे उत्पात समाजानेच बनवून घेत देवीला अर्पण केलेले आहेत . रुक्मिणी मातेच्या अलंकारात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी दिलेली सोन्याच्या 60 मोहरांची माळ , शिंदे सरकार घराण्याकडून रुक्मिणी मातेला अनेक अलंकार अर्पण करण्यात आलेले आहेत. यात मोत्याचे लहान मोठे कंठे , हिरेजडित पाचूची गरसोळी , हिरेजडित तानवड जोड , कमालखाणी म्हणजेच पाचपदरी शिंदे हार , सोन्याचे चुडे , मणी मोत्यांच्या पाटल्या , हिरेजडित सूर्य , 23 माणिक असलेला चंद्रमा हे मौल्यवान अलंकार आहेत.
बडोदे येथील भाऊसाहेब शिंदे यांनीही मातेला सोन्याचे तोडे जोड अर्पण केलेले आहेत. याच पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांनी रुक्मिणी मातेला सोन्याच्या घुंगुरांचे पैंजण , हिरेजडित बाजूबंद , मोत्याचा कंठ , पानाड्याचा बिंदी बिजवरा , हिरेजडित बाटल्यांचा जोड , असे अलंकार अर्पण केले आहेत. हैदराबादचे राजे चंदुलाल दिवाण हे देखील रुक्मिणीमातेचे निस्सीम भक्त होते. राजे चंदुलाल दिवाण यांनी मातेला नवरत्न हार , जडावाचा हार , मास पट्टा , हिरेजडित कर्णफुले, 32 पेट्या आणि एक वरवंटा असलेली असलेला सोन्याचा हायकोल, सोन्याचा 9 पदरी चंद्रहार, सोन्याचे रूळ जोड, सोन्याचा पाच पदरी चंद्रहार असे अनेक मौल्यवान अलंकार अर्पण केले.
हैदराबादचे राजे समबक्ष यांनीही अठराव्या शतकात जडावाची गरसोली अर्पण केली आहे . याशिवाय इतर भक्तांनी सोन्याचा झेला , सोन्याच्या तुळशीमाळा , सोन्याचा सात पदरी अष्टपैलू मण्यांचा कंठा , सोन्याचे वाक्य जोड , असंख्य प्रकारचे कंगन व इतर लहान मोठे मौल्यवान अलंकार अर्पण केले आहेत . उत्पात समाजाने देवीला सोन्याचा कोल्हापुरी साज , जावेची माळ, 64 पुतळ्यांची माळ , मत्स्य जोड मकराकार , पदकासह तारामंडळ , हिरे आणि तांबडे माणिक जाडीत चिंचपेटी , सोन्याचे मुकुट आणि अनेक लहान अलंकार करून घेतलेले आहेत . श्रीमंत वायजाबाई शिंदे सरकार यांनी रुक्मिणी मातेला सोन्याचे पातळ अर्पण केलेलं आहे . रुक्मिणी मातेकडून देशातील कोणत्याही श्रीमंत देवस्थानात देवीला असणारे बहुतेक सर्व प्रकारचे पुरातन आणि मौल्यवान दागिन्यांचा खजिना आहे.
विठ्ठल रुक्मिणी हे गोरगरिबांचे आराध्य दैवत असले तरी सर्वच प्रकारच्या भक्तांना कधी रिकाम्या हाताने परत न पाठवणारी ख्याती याची आह. त्यामुळेच देवाचा हा खजिना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे . हा खजिना शेकडो वर्षांपासून अनेक परकीय आक्रमणे होऊनही सांभाळण्याचे काम त्या त्या काळातील सेवाधाऱ्यांनी इमाने इतबारे केले. म्हणूनच आज हा देवाचा अमोघ ठेवा आज आपल्याला पाहता येतो. यातील अनेक दागिने त्या त्या काळातील त्या त्या शतकातील असले तरी यातील रुक्मिणी मातेकडे असलेल्या असंख्य दागिन्यांची पद्धतीचे दागिने नंतरच्या काळात मराठी मातीत रुजले आणि आजही यातील अनेक प्रकार महिला परिधान करीत असतात . देवाचे अलंकारात रूप हे वारकरी भाविकांना आनंददायी असल्याने वर्षातील चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मग वाद्य द्वादशी पर्यंत 60 दिवस विविध सण समारंभाला दागिने परिधान केलेलं असतात .
(विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील महत्त्वाच्या दागिन्यांची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिलेली आहे).