Supriya Sule : 'डिझेलचे दर वाढल्यामुळे नवऱ्याने सांगितलं दौऱ्यावर रेल्वेने जा', सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
Supriya Sule : वाढत्या डिझेलच्या दरावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टीप्पणी केली आहे.
पंढरपूर : 'हल्ली डिझेलचे दर वाढले असल्याने नवरा म्हणतो कि एकतर दौरे कमी कर किंवा दौऱ्यावर रेल्वेने जा', असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहे. पंढरपुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'इतर नेत्यांप्रमाणे माझ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, कारण मी इमानदार आहे. माझ्या गरजा कमी आहेत. मला खायला तुम्ही लोके देता आणि नवऱ्याने गाडीत डिझेल भरले की काम संपले. पण आता डिझेलचे भाव वाढल्याने नवरा पण दौऱ्यावर पण रेल्वेने जायला सांगतो.'
... तर प्रफुल्ल पटेलांशी काय बोलणार
मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मी गेले तीन दिवस झाले माझ्या नवऱ्याशी बोलले नाही, तर प्रफुल्ल पटेलांशी काय बोलणार. नवरा जेव्हा फोन करतो तेव्हा मी भाषण करत असते आणि मी घरी पोहचते तेव्हा नवरा झोपलेला असतो. त्यामुळे नवऱ्याशी बोलायला वेळ मिळत नाही, तर त्यांच्याशी काय बोलणार.' माळशिरस येथे सुप्रिया सुळेंनी त्यांच्या भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी केली.
मराठी नेत्यांचे खच्चीकरण होतं
'देशात सध्या अदृश्य शक्ती असून मराठी नेत्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. याच शक्तीने बाळासाहेब आणि शरद पवार या दोन स्वयंभू नेत्यांचा पक्ष फोडला . तर याच शक्तीने पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांचे देखील खच्चीकरण केले आहे', असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
'मला शेअर करायची सवय नाही'
'मला बाहेर पडल्यावर एका शेतकऱ्याने झुणका भाकरी कांदा आणि ठेचा अशी शिदोरी दिली. यातील कांदा मी शेअर करेन पण ठेचा अजिबात करणार नाही असं मी सांगितलं. कारण मी एकटी असल्याने मला गोष्टी शेअर केलेल्या आवडत नाही', असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 'मी इमानदार असल्याने माझ्यावर कोणताही कारवाई होणार नाही. मी कधीही कोणतं कॉन्ट्रॅक्ट केलं नाही कारण माझ्या गरजा फार कमी आहेत', असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.