Pandharpur News: नशीब बलवत्तर! चिमुरड्यानं दार लावल्याने अनर्थ टळला, मात्र... सोलापूर जिल्हा हादरला
Pandharpur News: हादरलेल्या बाळूने घराजवळ जाऊन मुलाच्या नावाने हाक मार लागल्यावर मुलाने दरवाजा उघडला. यानंतर चिमुरड्या रुद्राने वडिलांना घडलेला प्रकार सांगत हंबरडा फोडला.
सोलापूर: पंढरपुरच्या मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तिहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक महादेव माळी यांच्या दोन बहिणी आणि सुनेची शेतजमिनीच्या वादातून दगडाने ठेचून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महादेव माळी यांच्या मातोश्रीचं निधन काही दिवसापूर्वी झालं होतं. यासाठी माळी यांच्या दोन विवाहित बहिणी शेतातील वस्तीवर राहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, महादेव माळी हे गावातील हॉटेलकडे तर त्यांचा मुलगा बंडू हा त्याच्या कापड दुकानाकडे गेल्यावर दुपारी हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. दीपाली बाळू माळी ही महादेव माळी यांची सून आहे. तर पारूबाई बाबाजी माळी आणि संगीता महादेव माळी या दोन बहिणींची हत्या झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास महादेव माळी यांची सून शेतातील घराबाहेर कपडे धुवत होती तर तिच्या दोन आते सासू शेतात काम करत होत्या . त्याचवेळी अचानक नराधम समाधान लोहार याने दीपाली बाळू माळीवर (25 वर्षे) दगडाने हल्ला चढवला. दिपालीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यावर तिची आतेसासू पारुबाई बाबू माळी या धावत आल्या. मात्र तोपर्यंत दीपालीचा मृत्यू झाला होता.
पहिली हत्या केल्यानंतर नराधम समाधान याने आपला मोर्चा 50 वर्षीय पारुबाई हिच्याकडे वळविला आणि तिलाही दगड आणि फावड्याच्या दांड्याने ठेचून तिची हत्या केली. यावेळी पारुबाई यांची दुसरी बहिण संगीता या पळू लागल्यावर समाधान याने घराच्या मागच्या बाजूला तिला गाठून तिची अशाच क्रूर पद्धतीने हत्या केली. हा सर्व प्रकार घडत असताना चिमुरड्या रुद्राने घराचे दार लावून घेतल्याने त्याचा जीव वाचला.
महादेव माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून नंदेश्वर येथील शेतातील वस्तीवर राहत आहेत. त्यांच्या आईचे निधन झाल्याने काही दिवस गावातील हॉटेल बंद होते. काल त्यांनी सकाळी हॉटेल उघडले आणि तेथे महादेव आणि त्यांचा लहान मुलगा हॉटेलमध्ये होते. मोठा मुलगा बाळू याचे नंदेश्वर गावात कपड्याचे दुकान असून तो त्याच्या आईला घेऊन सकाळीच दवाखान्याची सांगोला येथे गेला होता. दुपारी दवाखान्याचे काम करून पाच वाजता वस्तीवर पोचल्यावर त्याला पहिल्यांदा आपल्या पत्नीचा मृतदेह दिसला. यानंतर त्याने आत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर घराच्या बाजूला आत्या मृतावस्थेत दिसली. दरम्यान दुसरी आत्या आणि मुलगा कोठे आहे याचा शोध घेऊ लागल्यावर घराच्या मागे दुसऱ्या आत्याचा देखील मृतदेह दिसला. हादरलेल्या बाळूने घराजवळ जाऊन मुलाच्या नावाने हाक मार लागल्यावर मुलाने दरवाजा उघडला. यानंतर चिमुरड्या रुद्राने वडिलांना घडलेला प्रकार सांगत हंबरडा फोडला.
या सर्व प्रकारानंतर शेजारी जमा होऊ लागले आणि पोलिसांना खबर देण्यात आल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस चौकशीत शेजारी वस्तीवर राहणार समाधान लोहार याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्यावर त्यानेच हे हत्याकांड केल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाल्यावर त्याची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान दवाखान्यावरून येताना बाळू याना आरोपी त्याच्या शेतात मेंढ्या चरायला घेऊन जाताना दिसला होता. नराधम समाधान लोहार आणि त्याच्या कुटुंबाचा आम्हाला सातत्याने त्रास असल्याचे बाळू माळी यांनी सांगितले. आता पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरू लागली असून या हत्येमागचे नेमके कारणाचा पोलीस शोध घेऊ लागले आहेत.
आरोपी माळी याच्या शेजारीच राहणार असून त्याचा कुटुंबातील महिलांना काही त्रास होता का याचाही पोलीस शोध घेत आहेत. एकाचवेळी झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे सोलापूर जिल्हा हादरून गेला असून चिमुरड्या रुद्राचा जीव वाचला असला तरी तो मात्र पोरका झाला आहे. या घटनेनंतर नंदेश्वर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून संपूर्ण गाव माळी यांच्या वस्तीवर जमलं आहे. आता पोलिसांच्या हाती नराधम समाधान लोहार सापडला असला तरी या हत्येमागचे खरे कारण शोधण्याचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान आहे .