(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Maharashtra Politics: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यातील मराठा समाजाला कुणबी नोंदी असल्यास कुणबी जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणे शक्य झाले होते.
सोलापूर: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नुकतेच उपोषण करुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (OBC Reservation) न देण्याचे लेखी आश्वासन सरकारकडून पदरात पाडून घेतले होते. या आंदोलनावेळी लक्ष्मण हाके यांनी बोगस कुणबी दाखल्यांचा (Maratha Kunbi Certificate) मुद्दाही उपस्थित केला होता. यानंतर आता लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे सहकारी सतीश कुलाल यांनी बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे.
सतीश कुलाल यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून दिलेले दाखले तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारातून कागदपत्र मागवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी कुलाल यांनी माळशिरस तालुक्यात अर्ज दाखल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील एकाही व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले तर याद राखा, असा इशारा दिला होता. मात्र, आता लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्याने बोगस कुणबी दाखले रद्द करण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सतीश कुलाल यांनी आपल्या अर्जात कुणबी प्रमाणपत्र दिल्या त्या सर्व नोंदींची यादी आणि त्याला जोडलेले पुरावे, माहितीच्या अधिकारातंर्गत मागवून घेतले आहेत. अनेक कुणबी दाखल्यांमध्ये फेरफार आणि खाडाखोड करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाकडून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील 353 तालुक्यातील नोंदी पुढील महिनाभरात गोळा केल्या जाणार आहेत. त्यानुसार नव्याने लागू करण्यात आलेल्या सर्व कुणबी दाखल्यांची तपासणी करुन बोगस दाखले रद्द करायला लावू, अशी माहिती सतीश कुलाल यांनी दिली.
कुणबी कृती समितीचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
सरकारने मनोज जरांगे यांचे लाड पुरवणे बंद करावे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे कुणबी जात दाखले देऊ नये, असा इशारा सर्व शाखीय कुणबी कृती समितीने दिला आहे. एवढंच नाही तर मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची भाषा करणार असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातला कुणबी समाज एकसंघपणे आपल्या राजकीय शक्तीचा दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही सर्व शाखीय कुणबी कृती समितीने दिला आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार कुणबी जातीचे दाखले देण्यासंदर्भातला निर्णय मागे घेतला नाही, तर कुणबी समाज राज्यभर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही सर्व शाखीय कुणबी कृती समितीचे प्रवक्ते राजेश काकडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.
मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द केली तर.... मनोज जरांगेंचा इशारा
मराठा समाजाच्या ५६ लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी नेते करीत आहेत. येवल्यावाल्यांचे (मंत्री छगन भुजबळ) ऐकून जर एकही कुणबी नोंद रद्द केली तर महागात पडेल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली होता.
आणखी वाचा
जरांगे म्हणतात 80 टक्के मराठा ओबीसीत घुसवलाय, राज्यात बोगस कुणबी घोटाळा; लक्ष्मण हाकेंचा आरोप