Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांच्या विरोधात अश्लील कमेंट्स करणे भोवले, 28 जणांविरोधात गुन्हा दाखल
State Women Commission : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया देताना काही युजर्सनी अश्लील कमेंट्स केल्या होत्या. या प्रकरणी 28 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या विरोधात अश्लील कमेंटस् करणाऱ्या 28 जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. फेसबुक पेजवरील कमेंटसच्या आधारे सोलापूरमधील बार्शी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी वटपौर्णिमाबद्दल काही विचार व्यक्त केले होते. त्यामध्ये 'मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही.'समाजाला सत्यावानाची सावित्री कळली. मात्र ज्योतिबांची सावित्री कळलीच नाही' असे विचार व्यक्त केले होते. त्यांच्या या विचारांवर सोशल मीडियावर अनेक ठिकाणी टीका-टिप्पणी झाली. या प्रकरणी बार्शी पोलिसांमध्ये एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना काही व्यक्तींनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात अश्लील टीका देखील केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
फेसबुकवरील एका पेजने रुपाली चाकणकरांनी वटपौर्णिमेबद्दल केलेले विधान स्वतच्या वॉलवर शेअर करत लोकांचे मत विचारले होते. यावर व्यक्त होताना बार्शीतील युवराज ढगे या तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा किशोर शिवपुरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनंतर आरोपी युवराज ढगे विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. गुन्ह्यात वापरलेले कलम हे जामीनपात्र असल्याने युवराज ढगे यास जामीन देखील देण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करताना बार्शी पोलिसांनी युवराज ढगे याने ज्या पोस्टवर कमेंट केली होती त्या पोस्टची पाहणी केली. या फेसबुक पोस्टवर एक हजाराहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक कमेंटस् या अश्लील भाषेत होत्या. त्यामुळे पोलिसांनी यांसदर्भात गंभीर दखल घेतली. या सर्व एक हजार कमेंटसची पाहणी केल्यानंतर एकूण 28 व्यक्तींच्या कमेंटस या अतीशय खालच्या भाषेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या सर्व आरोपींविरोधात केवळ माहिती आणि तंत्रज्ञान कायदाच नव्हे तर विनयभंगा सारखा गंभीर गुन्हा दाखल केलाय. या सर्व कमेंट्स करणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
"या प्रकरणी अनेकांनी आक्षेपार्ह कमेंट्स केल्या आहेत. यातील 28 व्यक्तींनी अश्लील भाषेचा वापर केलाय. त्यामुळे एखाद्या स्त्रीचा विनयभंग होऊ शकतो. वैयक्तिक पातळीवर जाऊन इतक्या खालच्या भाषेत टीका करण्याऱ्यांविरोधात आम्ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून या 28 अकाऊंटसची माहिती सायबर शाखेकडे पाठवण्यात आली आहे. यातील बरेच आरोपी हे पुणे, नांदेड, सांगली या भागातील आहेत. त्यांचा देखील शोध सुरु आहे" अशी माहिती बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली.