मराठा आंदोलनाचा फटका; दिवाळीच्या तोंडावर सोलापुरात बाजारपेठा ओस, व्यावसायिकांमध्ये चिंता
Solapur News: वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2023) अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मात्र बाजारपेठा पूर्णतः ओस पडल्या आहेत.
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नामुळे महाराष्ट्र वातावरण पेटलेल आहे. मागील नऊ-दहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग अजूनही कमी होण्यास तयार नाही. सरकार वेळ वाढवून मागत आहे तर आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पेटलेल्या आंदोलनामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळते. अनेक ठिकाणी एसटी ठप्प आहे, तर कुठे प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. अशातच वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2023) अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मात्र बाजारपेठा पूर्णतः ओस पडल्या आहेत.
कुठं अन्न पाण्याशिवाय सुरु असलेलं आमरण उपोषण, कुठं रास्ता रोको तर कुठं जाळपोळ सुरू आहे. मागच्या जवळपास दहा दिवसापासून सुरु असलेल्या मराठा आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. एकीकडे आंदोलनाची तीव्रता वाढतेय त्यामुळे आंदोलक आक्रमक भूमिकेत आहेत . तर दुसरीकडे दिवाळीचा सण तोंडावर आलाय तरी देखील बाजार ओस पडले आहेत. कोणताही सण हा बळीराजा शिवाय पूर्ण होतं नाही, यंदाच्या वर्षी पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला होता, बाजारात माल गेला नाही. त्यातच मराठा आंदोलन पेटलं आणि बाजारपेठ देखील पूर्णतः थांबली आणि त्यामुळे आता शेतकरी म्हणतयात सांगा दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पडला आहे.
सोलापूरची नवी पेठ ग्राहकांविना ओस
दिवाळी म्हटलं की सर्वत्र उत्साह असतो, बाजारात लगबग असते. अवघे 8-10 दिवस राहिले तरी बाजारात अजून शुकशुकाट आहे. नांदेडच्या बाजारात घर सजवण्यासाठी असलेले साहित्य अद्यापही दुकानातच आहेत . जी परिस्थिती नांदेड आणि लातूरची.. तीच अवस्था सोलापूरच्या बाजाराची देखील आहे. सोलापूरची नवी पेठ ग्राहकांविना ओस पडली आहे. मागच्या वर्षी झालेला तोटा यंदा तरी भरून निघेल या अपेक्षेने व्यापाऱ्यानी लाखोंचा माल दुकानात भरलाय मात्र ग्राहक बाजारात नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या धामधूमीत व्यापाऱ्यांचीही दिवाळी देखील अडचणीत आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांमध्ये भरडला जाणारा समाज आता सरकारच्या आरक्षणाची वाट पाहतोय.
नाशिक शहरासह जिल्ह्यात एकाही घरात दिवाळी साजरी होणार नाही
नाशिकच्या (Nashik District) शिवतीर्थावर सुरू असलेल्या मराठा मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत विविध क्षेत्रातील, समुदायातील मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वाभिमुख ठराव घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने मराठा समाजाचा आधारस्तंभ मनोज जरांगे पाटील (manoj jarange) यांची प्रकृती बघता व मराठा समाज शिक्षण आणि रोजगारातील आरक्षणासाठी झगडत असतांना नाशिक शहर व जिल्ह्यात एक ही घरात दिवाळी साजरा होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.